ड्रोन विमानांची आफ्रिका, मिडल इस्टवर नजर

वॉशिग्टन दि.२२ – अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात दहतशवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि दहशतवादी तळांवर हल्ले करण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या अमेरिकेच्या ड्रोन विमानांची आता अन्यत्र पाठवणी सुरू असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या विमानांचा वापर ठार मारणे या ऐवजी सशस्त्र गट, ड्रग माफिया, तस्कर, दरोडेखोर यांच्यावर नजर ठेवण्यासाठी करण्याची योजना आखली गेली आहे. यामुळे अमेरिकी गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

मध्यपूर्वेत कतार तसेच अरम अमिराती मध्ये ड्रोन हब बनविले गेले आहे. येथूनच अमेरिका आपले कार्य पार पाडत आहे. नोव्हेंबरपासून दोन वेळा इराण ने आपल्या हवाई क्षेत्राजवळ आलेल्या ड्रोन वर हल्ले चढविण्याच्या घटनाही घडल्या आहेत. आफ्रिकेत पाच महिन्यांपूर्वीच अमेरिकेने अल कायदा हल्लेखोर व विरोधकांवर नजर ठेवण्यासाठी उत्तर मालीजवळ सहारा वाळवंटात ड्रोन उड्डाणे सुरू केली आहेत.

पेंटागॉनमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इथिओपिया, सेशेल्स व जिबूटी येथेही ड्रोन साठी बेस तयार केले गेले आहेत. पाकिस्तान व अफगाणिस्तानात अमेरिकेची ४०० ड्रोन वापरली गेली असून त्यात प्रिडेटर्स, रिपर्स, हंटर्स व उंचावरून उडणारी ड्रोन यांचा समावेश होता. या मानवरहित विमानांच्या सहाय्याने अमेरिकेने अल कायदा व अन्य दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना ठार करण्यात यश मिळविले आहे.

Leave a Comment