टिव्ही अंगावर पडण्याच्या घटनांत २ लाख मुले जखमी

वॉशिंग्टन दि.२२ – गेल्या वीस वर्षात टिव्ही सेट अंगावर पडल्यामुळे अमेरिकेत दोन लाखांवर मुले जखमी झाली असल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या दहा वर्षात अशा प्रकारच्या घटनांत २१५ मुलांचा मृत्यू झाला आहे. जोनवारी २०१२ पासून या प्रकारे टिव्ही अंगावर पडून झालेल्या अपघातात ६ मुले ठार झाली आहेत असेही नमूद करण्यात आले आहे.

गेली कांही वर्षे टिव्ही सेट अंगावर पडून जखमी झाल्यामुळे रूग्णालयात हलवावे लागणार्‍या मुलांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ दिसून येत असून यातील बहुसंख्य मुले पाच वर्षांच्या आतली आहेत. त्यासंदर्भात आता जनजागृती करणे गरजेचे असल्याचे डॉक्टर व सुरक्षा तज्ञांचे म्हणणे आहे. बालरोगतज्ञ व चाईल्ड इंज्युरी प्रिव्हेन्शन अलायन्सेस- कोलंबस चे अध्यक्ष डॉ. गॅरी स्मिथ या संदर्भात माहिती देताना म्हणाले की घरात जुने व जड टिव्ही सेट ड्रेसर अथवा डगमगत्या फर्निचर वर ठेवले जातात. लहान मुले त्यावर चढण्याचा प्रयत्न करतात व यातून बोजड टिव्ही खाली घसरतात व मुलांना डोके अथवा मानेला इजा पोहोचते असे दिसून येत आहे. या दुखापती चिंताजनक स्वरूपाच्या असू शकतात.

२०११ सालात याप्रकारे १२३०० मुले जखमी झाली होती व त्यातील बहुसंख्यांवर रूग्णालयात दाखल करण्याची पाळी आली.१९९० मध्ये हे प्रमाण ५४५५ इतके होते. कन्झ्युमर प्रॉडक्ट सेफ्टी कमिशनचे प्रवक्ते स्कॉट वॉल्फसन यांच्या मते आजकाल फ्लॅट स्की्रन टिव्हीची क्रेझ आहे. त्यामुळे जुने जड टिव्ही लोक बेडरूममध्ये ड्रेसरवर ठेवतात असे आढळून आले आहे. या ड्रेसरवर लहान मुले चढतात तेव्हा ते कोसळते आणि टिव्ही पडून त्यांना इजा होते आहे. भिंतीत घट्ट बसणारे फर्निचर वापरावे अथवा जुने टिव्ही घट्ट बसू शकतील यासाठी मुद्दाम वेगळे फर्निचर करून घ्यावे यासाठी पालकांत जागृती करण्याचे काम हाती घेतले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Comment