रमय्या वस्तावय्या

सलमान खान सोबत ‘वॉन्टेड‘, अक्षयकुमार बरोबर ‘रावडी राठोड’ असे टिपीकल बॉलिवूड मसालापट देणारा दिग्दर्शक प्रभूदेवा यावेळी ’रमय्या वस्तावय्या’ या रोमँटीक चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटातून टिप्स फिल्म्सचे कुमार एस. तौराणी यांचा मुलगा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय. प्रभुदेवाने हिंदीमध्ये दिग्दर्शित केलेले दोन्ही चित्रपट हंड्रेड करोड क्लबमध्ये आहेत, त्यामुळे ’रमय्या वस्तावय्या‘कडून अपेक्षा अधिक आहेत.

‘रमय्या वस्तावय्या’ ही कथा राम (गिरीश कुमार) या तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. हा तरुण ऑस्ट्रेलियात राहणार्‍या एनआरआय जोडप्याचा टिपीकल टवाळखोर मुलगा आहे. त्याच्या मामे बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तो भारतात आपल्या आई सोबत आला आहे. याच लग्नात रामची भेट सोना (श्रुती हसन) बरोबर होते. तिला बघताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडतो. त्याच दरम्यान त्याच्या आईने दुसरी मुलगी त्याच्यासाठी शोधली आहे. त्या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम सर्वांना समजते आणि कथा नव्या टप्प्यावर येते. सोनाला तिचा भाऊ (सोनू सूद) त्या लग्नातून घेऊन जातो. राम त्याच्या आई सोबत ऑस्ट्रेलियामध्ये न जाता तिच्या गावी जातो. सोनाचा भाऊ रामला शेतात काम करण्याचे आव्हान देतो. परदेशात वाढलेला राम आपल्या प्रेयसीच्या भावाला इम्प्रेस करण्यासाठी हे आव्हान स्विकारतो. घरच्यांचा विरोध मोडण्यात आणि सोनाच्या भावाचे आव्हान जिंकण्यात राम यशस्वी होतो का? या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी ‘रमय्या वस्तावय्या’ बघायला हवा.

प्रभूदेवाच्या वॉन्टेड आणि रावडी राठोड या चित्रपटांप्रमाणेच रमय्या वस्तावय्या टिपिकल मसाला, मनोरंजनपट आहे. फरक एवढाच पूर्वीचे दोन्ही अ‍ॅक्शनपट होते तर हा रोमँटीकपट आहे. रमय्या वस्तावय्या हा ’नुव्वोस्तानांते नुव्वोस्तानांते’ या तेलगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. मात्र त्या बरोबरच हा चित्रपट सलमान खानच्या सुपरडुपर हिट ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाची आठवण करून देतो. या कथानकावर आधारित अनेक चित्रपट यापूर्वी आपण बघितले आहेत. यामुळे चित्रपटात पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना राहत नाही. एका प्रस्थापित निर्मात्याच्या मुलाला लाँच करायचे म्हणजे चित्रपटात प्रेमकथा असावी असा बॉलिवूडचा अलिखित नियम आहे. अपवाद म्हणून अर्जुन कपूरचे नाव घ्यावे लागेल, त्याच्या दोन्ही चित्रपटात त्याने ग्रे शेड रोल केला आहे. कुमार एस. तौराणींचा मुलगा गिरिशची बॉलिवूडमध्ये या निमित्ताने एन्ट्री झाली असली तरी त्याचा अभिनय बघता बाहेरच्या चित्रपटात संधी मिळणे अवघड आहे.

श्रुती हसन हिंदी, तामिळ, तेलगु चित्रपटांमधून भूमिका करत असली तरी सोनाच्या भूमिकेवरून तिला अभिनयाची एबीसीडी आणखीनही जमत नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. श्रुतीच्या भावाच्या भूमिकेत असलेला सोनु सुद वगळता इतर सहकलाकार आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले आहे. चित्रपटाचे संगीत, आयटम नंबरवर प्रभुदेवाची जवरदस्त छाप दिसते. चित्रपटाचे लोकेशन सुंदर आहेत. एकंदरीत प्रभुदेवाचा हा चित्रपट टिपीकल रोमँटीकपटाच्या पठडीत बसणारा आहे.

चित्रपट – रमय्या वस्तावय्या
निर्माता – कुमार एस. तौरानी
दिग्दर्शक – प्रभूदेवा
संगीत – सचिन-जिगर
कलाकार – गिरीश कुमार, श्रुती हासन, सोनू सूद.

रेटिंग – * *

 

Leave a Comment