बाळासाहेबांच्‍या आयुष्‍यावर मराठी चित्रपट?

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्‍या आयुष्‍यावर लवकरच चित्रपट निर्मिती होणार असल्‍याची चर्चा आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करणार असल्‍याचे बोलले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्‍ट्राच्‍या राजकारणात अतिविशिष्‍ठ स्‍थान आहे. तमाम मराठी जनांच्‍या हृदयावर आजही त्‍यांचेच नाव कोरले गेले आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जनतेने हे स्‍थान दिले आहे. यामागे बाळासाहेबांचा संघर्ष, जनतेच्‍या प्रश्‍नांची जाण आणि थेट हृदयाला भिडणारे वक्तृत्त्व, यासारखी अनेक कारणे आहेत. बाळासाहेबांच्‍या स्‍पष्‍ट आणि कणखर शब्‍दांनी अनेकवेळा दिल्‍लीतील नेत्‍यांनाही घायाळ केले होते.

पाकिस्‍तानातही बाळासाहेबांची दहशत होती. बाळासाहेबांचे भाषण ऐकण्‍यासाठी हजारो चाहते पायपीट करुन सभेला गर्दी करायचे. बाळासाहेबांच्‍या शब्‍दांमध्‍ये प्रत्‍येकाला स्‍वतःच्‍या वेदना जाणवायच्‍या. स्‍वतःचे अस्तित्त्व वाचविण्‍यासाठी सुरु असलेला एक संघर्ष त्‍यातून व्‍यक्त व्‍हायचा. बाळासाहेबांनी या जगाचा निरोप घेतला त्‍यावेळी मुंबापूरी थांबली होती. आता बाळासाहेबांचे आयुष्‍य पडद्यावर दाखविण्‍यासाठी अनेक निर्माते आतूर झाले आहेत. अनेक जण बाळासाहेबांवर चित्रपट काढण्‍यासाठी इच्‍छूक आहेत. सुत्रांच्‍या माहितीनुसार, बाळासाहेबांच्‍या आयुष्‍यावर मराठी चित्रपट काढण्‍याची तयारी सुरु झाली आहे. महेश मांजरेकर त्‍याचे दि‍ग्‍दर्शन करणार आहेत. चित्रपटाची रुपरेषा कशी असेल यावर प्रचंड विचार आणि चर्चा सुरु असून बाळासाहेबांची भूमिका कोण साकारणार, याबाबतही शोध घेण्‍यात येत आहे.

Leave a Comment