स्वभाषेचा निरर्थक अभिमान

कोणाच्याही मनात स्वभाषा, स्वदेश आणि स्वधर्म याविषयी अभिमान असला पाहिजे परंतु तो निरर्थक असता कामा नये. भारतामध्ये याबाबतीत दोन टोके आढळतात. अनेक लोकांना आपल्या भाषेविषयी अभिमानच वाटत नाही. इंग्रजी आले आणि इंग्रजीत शिक्षण घेतले की आपण सार्‍या जगाला जिंकू शकू असा त्यांच्या मनात भ्रम असतो. तो चुकीचा आहे. परंतु म्हणून इंग्रजीचा विनाकारण द्वेष करावा हेही काही खरे नाही. परंतु काही लोक इंग्रजीचा द्वेष करतात आणि स्वभाषेचा ताठा मिरवतात. हेही चुकीचे आहे. जोपर्यंत आपण आपल्या देशी भाषांना ज्ञानभाषा बनवत नाही तोपर्यंत आपण आपल्या भाषेचा अभिमान बाळगण्यात आणि इंग्रजीचा द्वेष करण्यात काही अर्थ नाही. गेल्या ७० वर्षापासून आपल्या देशामध्ये भाषेच्या संदर्भात असे अनेक समज, गैरसमज निर्माण झाले आहेत आणि ते पसरवण्यात आलेले आहेत. खरे म्हणजे भाषा हे प्रगतीचे साधन असते आणि तिच्या बाबतीत आपण भलत्या सलत्या कल्पना बाळगून बसलो तर आपली प्रगती होणार नाही. म्हणून जाणत्या लोकांनी आणि समाजाचे नेतृत्व करू पाहणार्‍यांनी भाषेच्या बाबतीत अतीशय शास्त्रशुध्द आणि तर्कशुध्द विचार बाळगले पाहिजेत आणि बोलले पाहिजेत. भारतात नेमके हेच होत नाही. हे या देशाचे दुर्दैव आहे.

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी दोन दिवसांपूर्वी इंग्रजी भाषेला आडवे घेतले. इंग्रजी भाषेमुळे देशाचे नुकसान झाले आहे असा शोध त्यांनी लावला. त्यापाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनीही वेगळ्याच शब्दांमध्ये इंग्रजी हे प्रगतीचे एकमेव माध्यम नाही. असा विचार मांडला. संघ परिवारातल्या लोकांना जग कुठे चाललेले आहे हे कळते की नाही असा प्रश्‍न पडतो. कारण जग वेगळ्या दिशेला चाललेले असते आणि संघाची मंडळी कुठली तरी जुनी भाषा वापरत असतात. जुने विचार मांडत असतात. सरसंघचालक आणि भाजपाचे अध्यक्ष इंग्रजी विषयी आज जे काही बोलत आहेत ते संघातल्याच कित्येक स्वयंसेवकांना आणि भारतीय जनता पार्टीच्या कित्येक कार्यकर्त्यांना अजिबात मान्य नाही. कारण इंग्रजी विषयीची आपल्या मनातली शत्रुत्वाची भावना आपल्या फायद्याची नाही हे आता लोकांना समजायला लागले आहे. मुक्त अर्थव्यवस्थेच्या युगात तरी इंग्रजी ही जगाची भाषा होऊन बसली आहे. २५ वर्षांपूर्वी असे कोणी म्हणू शकले नसते. पण आज मात्र तसे म्हणण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. इंग्रजी हे एकमेव प्रगतीचे साधन नाही.

ही गोष्ट जगात कोणीही मान्य करील कारण चीन, जपान, रशिया, जर्मनी इत्यादी बलाढ्य देशांनी इंग्रजी माध्यमाचा वापर न करता आपल्या देशाची प्रगती घडवून आणली आहे. भारतीयांनी मात्र स्वातंत्र्य मिळाल्यावर मात्र आपल्या देशी भाषांचा आग्रह धरण्याऐवजी इंग्रजीचाच आग्रह धरला. भारतीयांसाठी इंग्रजी ही सत्ताधार्‍यांची भाषा होती. त्यामुळे इंग्रजांची सत्ता गेली तरीही भारतात इंग्रजीला प्रतिष्ठा मिळत गेली. भारताची घटनाच इंग्रजीत तयार झालेली आहे. त्यावेळी आपण इंग्रजीचा दुःस्वास आणि देशी भाषांचा पुरस्कार केला नाही. डॉ. राम मनोहर लोहिया यांनी आपल्या या गुलामी वृत्तीच्या विरोधात बंड केेले आणि इंग्रजी हटाव मोहीम चालवली. ज्या काळात त्यांनी ही गोष्ट केली त्या काळाशी सुसंगत होती. कारण आपल्या देशातल्या लोकांनी त्या काळी इंग्रजीचा अभिमान इंग्रजांची भाषा म्हणून धरलेला होता आणि त्यामागे गुलामी वृत्ती होती. आज मात्र इंग्रजीचा पुरस्कार केला जात आहे. त्यामागे सर्वथा गुलामीची वृत्ती नाही. तर व्यापारी वृत्ती आहे. अमेरिका ही जगातली सर्वात मोठी आर्थिक शक्ती आहे आणि तिच्याशी संपर्क ठेवून जागतिक व्यापारात आघाडीवर राहायचे असेल तर इंग्रजी भाषा आलीच पाहिजे. ही आजची अपरिहार्यता ठरली आहे. रशिया, चीन, जपान यांनी इंग्रजीचा स्पर्शही न होऊ देता अमेरिकेच्या तोडीची प्रगती केली. त्यांनी त्या काळामध्ये आपल्या मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान दाखवून दिला. परंतु हे मातृभाषेेचे अभिमानी देश सुध्दा आज इंग्रजीची अपरिहार्यता मान्य करायला लागले आहेत.

ज्या देशांशी व्यापार करायचा असेल त्या देशाची भाषा शिकली पाहिजे हे लक्षात घेऊन केवळ इंग्रजीच नाही तर इतरही भाषांचे शिक्षण या देशात दिले जायला लागले आहे. कदाचित भारतातल्या बर्‍याच लोकांना ही गोष्ट माहीत नसेल की चीनमध्ये हिंदी भाषा शिकविणारे वर्ग सुरू झाले आहेत. कारण भारत कधी ना कधी महाशक्ती होणार आणि तिच्याशी आपल्याला व्यापार करावा लागणार हे चिनी लोकांच्या लक्षात यायला लागले आहे. आजच्या काळात तरी कोणत्याही एका भाषेचा विशेषतः इंग्रजीचा दुःस्वास करणे उपयोगाचे नाही. उलट आपल्या मातृभाषेशिवाय जगातल्या अन्य कुठल्या तरी एका भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे ही गोष्ट आता जगात सर्वत्र मान्य केली जायला लागली आहे. भारतात आज बहुजन समाजात आणि आजवर शिक्षणात मागे असलेल्या मागासवर्गीय जातींमध्ये आपल्या मुलांना इंग्रजीतून शिक्षण दिले पाहिजे ही ईर्ष्या जागी आहे. उच्चवर्णीय समाजातील लोक आपल्या मुलांना इंग्रजीतून शिक्षण देऊन त्यांना जगाच्या पाठीवर कोठेही जाण्यास सक्षम करत आहेत. तेव्हा त्यांचे अनुकरण करून आपणही आपल्या मुलांना इंग्रजीतूनच शिक्षण दिले पाहिजे अशी भावना या समाजात वाढीला लागली आहे. भाजपाचे अध्यक्ष आणि सरसंघचालकांनी कालबाह्य ठरलेली इंग्रजीविरोधी मोहीम चालवण्याचा अट्टाहास केला तर बहुजन समाजात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणार्‍या मुलांचा अभ्यास इंग्रजीतून शिक्षण घेणार्‍या मुलांपेक्षा पक्का असतो. असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. परंतु आता तशी स्थिती राहिलेली नाही. मुलांच्या पुढे अनेक माध्यमे आहेत आणि त्या माध्यमांच्यामुळे त्यांच्यासाठी इंग्रजी ही भाषा म्हणावी तेवढी अगम्य राहिलेली नाही. त्यामुळे ही मुले शिक्षणात पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा वेळी इंग्रजी भाषा आणि माध्यम यांच्या विषयी जुने विचार उगाळत बसलो तर या वर्गात विनाकारण संभ्रम निर्माण होईल.

Leave a Comment