रा. स्व. संघाला हवाय समर्थ भारत- भागवत

पाटणा – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिदुत्वाच्या आधारावर आणि हिंदुत्वाची संकल्पना मध्यवर्ती ठेवून समर्थ भारत देश निर्माण करायचा आहे असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. संघाच्या कार्यक्रमांची माहिती न घेताच अनेकजण संघाविषयी बोलत असतात या बद्दल भागवत यांनी खेद व्यक्त केला. काही लोक तर संघाची विनाकारण बदनामी करीत असतात असे ते म्हणाले. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या संघ स्वयंसेवकांच्या मेळाव्यापुढे ते बोलत होते.

हिंदुत्व हीच हिदुस्थानची ओळख आहे. हिंदुत्व हाच हिंदुस्थानचा गाभा आहे. हिंदुत्वाकडे कोणत्या तरी एका धर्माची किंवा जातीची विचारसरणी म्हणून पाहणे चुकीचे आहे. अचूक विचारांच्या आधारावर सामाजिक बदल होत नाहीत तोपर्यंत कोणताही राजकीय नेता देशाला समर्थ बनवू शकत नाही असे श्री. भागवत म्हणाले. संघ हा भारतीय जनता पार्टीचा विचारांचा स्रोत आहे असे काही लोक प्रतिपादन करतात पण भागवत यांनी हे प्रतिपादन चुकीचे असल्याचे म्हटले.

पाटण्यात पार पडलेल्या या मेळाव्याला भाजपाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी आणि भाजपाचे अन्य अनेक नेते उपस्थित होते. रा. स्व. संघ समाजात विचारावर आधारलेला बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदवला होता आणि त्या वेळी देशाला सामर्थ्यशाली बनवण्याचा विचार अनेकवेळा मांडला होता असेही भागवत यांनी सांगितले.

Leave a Comment