क्रीडा क्षेत्राच्या विकासात अव्वल दर्जा प्राप्त करू – मुख्यमंत्री

मुंबई क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याने या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच अव्वल दर्जाचे स्थान प्राप्त करेल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, मुंबई शहर जिल्हा क्रीडा संकुल समिती व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने धारावी येथे विकसित करण्यात आलेल्या मुंबई शहर जिल्हा क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी शनिवारी मुख्यमंत्री बोलत होते. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण करुन या क्षेत्राच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्यात येत आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्यादृष्टीने त्यांना शासकीय सेवेत अधिक संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

या क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी एमएमआरडीए मार्फत सुमारे 21 कोटी 18 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या क्रीडा संकुलामध्ये इनडोअर क्रीडा सुविधा या प्रकारामध्ये दोन भव्य मल्टीपर्पज हॉल यामध्ये जिमनॅस्टीकचे सर्व प्रकार, कुस्ती, बॉक्सींग, कबड्डी, ज्युडो, कराटे, स्किटिंग, योगा इत्यादी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच आऊटडोअर क्रीडा सुविधा प्रकारामध्ये जलतरण तलाव, 200 मीटर धावमार्ग व इतर मैदानी स्पर्धा, बास्केटबॉल, कब्बडी, खो-खो, हॉली बॉल, हँडबॉल, शुटींग बॉल, मल्लखांब व रोप मल्लखांब, बेस बॉल इत्यादी खेळांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत

Leave a Comment