राज ठाकरे दोषी पोलिसांच्या पाठीशी

मुंबई – मनसे नेते राज ठाकरे यांनी लखनभैय्या बनावट चकमक प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या सर्व पोलिसांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे. या पोलिसांना हवी असलेली मदत करण्याची तयारी राज ठाकरे यांनी कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषेदत दर्शवली. यापूर्वी शिवसेनेनेही न्यायालयाने दोषी ठरवलेल्या या पोलिसांचे समर्थन केले आहे.

प्रदीप सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी शनिवारी राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राज यांनी याविषयीची मनसेची भूमिका स्पष्ट केली. या बनावट चकमक प्रकरणात सत्र न्यायालयाने वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रदीप सूर्यवंशी यांच्यासह २१ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यात तेरा पोलिसांचा समावेश आहे. राज यांनी पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचा आरोप केला. राज्य सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

नोव्हेंबर २००६ मध्ये वाशीमधून चौकशीसाठी म्हणून लखनभैय्याला ताब्यात सूर्यवंशी यांच्या पथकाने घेतले व नंतर त्याची हत्या केली होती. लखनभैय्याच्या भावाने या चकमकी विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात ही चकमक बनावट असल्याचे सिध्द झाल्यानंतर सर्व दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Leave a Comment