भाग मिल्खा भाग’ महाराष्ट्रात टॅक्स फ्री

– फ्लाईंग शीख मिल्खासिंग यांच्या जीवनावर आधारित असलेला “भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट टॅक्‍स फ्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासंदर्भात अध्यादेशही काढण्यात आला आहे. आता संपूर्ण महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री दाखवण्यात येणार आहे. ‘भाग मिल्‍खा भाग’ हा केंद्र सरकारच्‍या राष्‍ट्रीय फिल्‍म विकास निगम (एनएफडीसी) उपक्रमातर्फे सहनिर्मित आहे. तरुण पिढीला प्रेरणा देणे तसेच क्रिडा क्षेत्रात आवड निर्माण करणे, हा या चित्रपटाचा मुख्‍य हेतू आहे. त्यामुळे राज्य सरकारने हा चित्रपट करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्‍या संपूर्ण टीमने ‘भाग मिल्खा भाग’ टॅक्स फ्री करण्याची मागणी केली होती.

यासंदर्भात अभिनेता फरहान अख्तर, दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी विधान भवनात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेटसुद्धा घेतली होती. या
भेटीत फरहान अख्तरने म्हटले होते, की धावपटू मिल्खासिंग यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे या क्रीडापटूचा जीवनपट नव्या पिढीला समजला पाहिजे, अधिकाधिक लोकांपर्यंत हा चित्रपट पोहचण्यासाठी तो टॅक्स फ्री करण्यात यावा.””भाग मिल्खा भाग’ चित्रपटाने समीक्षकांची आणि सिनेरसिकांची पसंतीची पावती मिळवली आहे. रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात या सिनेमाने 32 कोटींची कमाई केली होती. मिल्खासिंग यांच्या आयुष्यातील अनेक पैलू चित्रपटातून उलगडण्यात आले आहेत.

Leave a Comment