पूनम पांड्येच्या पोस्टरवरून खळबळ

नवी दिल्ली : देह प्रदर्शनाच्या बाबतीत प्रसिध्द असलेल्या जाहीरात मॉडेल कम अभिनेत्री पूनम पांड्येच्या ‘नशा’ या नव्या चित्रपटाच्या पोस्टरमुळे दिल्लीतल्या काही नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून सीमापुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिचे पोस्टर्स फाडून आपला संताप व्यक्त केला. पूनम पांड्येचा हा पहिला चित्रपट आहे. काही मुस्लीम बांधवांनी हा संताप व्यक्त करून सीमपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या चित्रपटाच्या निर्मात्याविरुध्द फिर्याद दाखल करण्याची मागणी केली.

नशा हा पूनम पांड्येचा पहिलाच चित्रपट आहे आणि तिने या चित्रपटात देहप्रदर्शन केल्यामुळे त्याचेच पोस्टर्स बनवून दिल्लीच्या काही भागांमध्ये लावण्यात आले आहेत. काही मुस्लीम लोक रमजानची प्रार्थना करून मशिदीच्या बाहेर आले तोच त्यांना समोर हे पोस्टर दिसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आणि या महिन्यात तरी अशा प्रकारचे नग्नतेचे प्रदर्शन करू नये अशी भावना व्यक्त केली.

चित्रपटाचे निर्माते आदित्य भाटिया यांनी या गोष्टीची दखल घेऊन हे पोस्टर हटविले आणि त्या ठिकाणी नवे पोस्टर लावले. आपल्या या चित्रपटाला सेन्सॉरची मान्यता असल्यामुळे त्याचे पोस्टर्स कोणी फाडू शकत नाही आणि ते बदलण्याचा प्रश्‍नही येत नाही असे भाटिया म्हणाले. स्वतःहा पूनम पांड्ये हिनेसुध्दा आपल्यावर खटला भरला तर आपण तोंड देण्यास समर्थ आहोत असे जाहीर केले.

दरम्यान पोलीस अधिकार्‍यांनी या संबंधात अद्याप तरी फिर्याद दाखल झाली नाही असा खुलासा केला. पूनम पांड्ये ही दिल्लीतच राहत आहे. आपल्यावर फिर्याद दाखल झाली तर आपण पोलीस ठाण्यात हजर राहू असे तिने म्हटले आहे.

Leave a Comment