अमेरिकन खासगी कंपन्या बसविणार चंद्रावर दुर्बीण

वॉशिंग्टन दि.२०- अंतराळ क्षेत्राच्या इतिहासात अमेरिकेत प्रथमच दोन खासगी कंपन्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर दुर्बीण बसविणार असून इंटरनॅशनल लूनर ऑबझर्व्हेटरी – मून एक्स्प्रेस असे या योजनेचे नामकरण केले गेले आहे. कमुन हवाई आणि सिलिकॉन व्हॅली येथील या कंपन्या इंटरनॅशनल ऑबझर्व्हेटरी असोसिएशन तर्फे हा उपक्रम पार पाडणार आहेत.

मून एक्स्प्रेस चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची सफर करणारी पहिली योजना असून या दुर्बिणीमुळे चंद्रावरून ऑन लाईन प्रतिमा मिळविणे सहज शक्य होणार आहे. परिणामी अॅस्ट्रोफिजिक्स मानव जातीला सहज सुलभतेने समजून घेणेही शक्य होणार असून हा प्रकल्प २०१६ मध्ये पूर्णत्वास नेला जाईल असे सांगितले जात आहे.

यात दोन मीटरची रेडिओ अँटेना आणि छोटी ऑप्टिकल दुर्बीण वापरली जाणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात पर्वतावर ही दुर्बीण अशा जागी बसविली जाणार आहे की जेथून आपल्या आकाशगंगेचा स्पष्ट नजारा पाहणे शक्य होणार आहे. चंद्रावर वातावरण नसल्याने पृथ्वीवरून दुर्बीणीतून निरीक्षणे करताना येणारे अडथळे येथे येणार नाहीत. तसेच मानवी वस्तीमुळे होणारे आवाज अथवा लहरींचा अडथळाही येथे येणार नाही असे मून एक्स्प्रेसचे सीइ्रओ डॉ. रॉबर्ट रिचर्ड यांनी सांगितले.

डॉ. रिचर्ड म्हणाले की चंद्राच्या आजवर अज्ञान असलेल्या भागात उतरणे ही घटनाच ऐतिहासिक महत्त्वाची आहे. येथून येणार्याअ प्रतिमा अधिक स्पष्ट असतीलच पण खगोल क्षेत्राप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनाही या प्रतिमा पाहता येणार आहेत. या उपक्रमासाठी १०० दशलक्ष डॉलर्स खर्च अपेक्षित आहे. खगोल विभाग आणि नॅशनल स्पेस एजन्सीकडून कांही अनुदान मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.