मी डान्सबार मंत्री नाही – आर.आर. आबा

मुंबई दि.१९- मी डान्सबार मंत्री नाही. डान्सबारपेक्षा राज्यातील दहशतवाद, नक्षलवाद यांची मला अधिक काळजी आहे तसेच देशातील महिलांची मानमर्यादा संभाळणे हेही माझे कर्तव्य आहे असे खडे बोल राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील उर्फ आबा यांनी डान्सबार समर्थकांना सुनावले असल्याचे समजते.

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र शासनाने डान्सबार वर घातलेली बंदी उठविल्यानंतर आबांच्या भेटीला आलेल्या डान्सबार समर्थकांना ते उत्तर देत होते. आबा म्हणाले डान्सबार पुन्हा सुरू करा म्हणणारे आपल्या घराशेजारी डान्स बारला परवानगी देतील काय याचे उत्तर त्यांनी प्रथम द्यावे. डान्सबारवर बंदी घालण्याचा निर्णय माझा एकट्याचा नव्हता तर विरोधी पक्षांसह सर्व आमदारांचा त्याला पाठिबा होता. डान्सबार बंद व्हावेत अशी मागणी सर्वच थरातून होत होती. कारण त्यामुळे मुंबईची कायदा सुव्यवस्था अधिक धोकादायक परिस्थितीत आली होती. बंदी आली नसती तर मुंबईची अवस्थाही जगातील अन्य कुप्रसिद्ध शहरांप्रमाणेच झाली असती.

बॉम्बे पोलिस अॅक्टमध्ये दुरूस्ती करताना नियमाप्रमाणे सर्व कार्यवाही केली गेली होती. राज्याचे अॅडव्होकेट जनरल व त्यानंतर कॅबिनेटची परवानगीही घेतली गेली होती असेही त्यांनी स्पष्ट केले. बंदी मुळे बारबालांची कमाई थांबली आणि त्यांना जगणे अवघड बनले असा दावा केला जात असला तरी समाजाला मान्य नसलेल्या गोष्टींना मान्यता कशी देता येईल असे विचारून आबा म्हणाले की मी डान्सबार मंत्री नाही. राज्याच्या गृहमंत्री या नात्याने माझ्यापुढे अन्य अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.

Leave a Comment