डेट्राईट दि.१९ – जगाची वाहन उद्योग राजधानी अशी ओळख असलेले अमेरिकेतील डेट्राईट शहर कर्जबाजारीपणात कोलमडले असून येथील महानगरपालिकेने शहराची दिवाळखोरी जाहीर केली असल्याचे वृत्त आहे. या शहरावर किमान १८ अब्ज डॉलर्सचे कर्ज असून ते फेडणे शक्य नसल्याने ही दिवाळखोरी जाहीर केली गेली आहे. अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणावर कर्ज असल्याने दिवाळखोरीची वेळ आलेले अमेरिकेतील हे पहिलेच मोठे शहर आहे.
मिशिगनचे गव्हर्नर रिक स्नायडर या संदर्भात जाहीर निवेदन देताना म्हणाले की डेट्राईट इमर्जन्सी मॅनेजरनी दिलेल्या माहितीनुसार मी डेट्राईट शहर दिवाळखोरीत निघाल्याचे जाहीर करण्यास परवानगी देत आहे. वास्तविक ही बाब अतिशय दुःखदायक आहे मात्र या दिवाळखोरीतून बाहेर पडण्याचा अन्य कांही मार्ग असता तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत दिवाळखोरी जाहीर केली नसती. मात्र आता सर्व मार्ग खुंटले आहेत.
एके काळी २० लाखांवर लोकसंख्या असलेल्या डेट्राईट मध्ये सध्या परिस्थिती अतिशय आणीबाणीची असून या शहराची लोकसंख्या ७ लाखांवर आली असल्याचेही समजते. देशातील चार नंबरचे शहर म्हणून याची ओळख होती. अमेरिकेच्या इतिहासात महापालिकेवर इतके मोठे कर्ज असण्याची ही पहिलीच वेळ आहे मात्र त्याला अनेक कारणेही आहेत. वेळेवर गोळा न केलेला कर, आरोग्य आणि पेन्शनचा वाढलेला खर्च, अतिशय निम्न प्रतीचे रेकॉर्ड किपिग आणि अकार्यक्षमता अशीही कारणे त्यामागे आहेत असेही स्नायडर म्हणाले.
१९७० च्या दशकात न्यूयॉर्क आणि क्लीव्हलँडवर तसेच त्यानंतर दोन दशकांनी फिलाडेल्फिया शहरावरही अशीच परिस्थिती ओढविली होती मात्र त्यातून यशस्वीपणे मार्ग काढण्यात आले होते व त्यामुळे या शहरांची दिवाळखोरी जाहीर करण्यातून सुटका झाली होती.