राज्यात तीन दिवसांपासून संततधार

मुंबई : गेल्या तीन दिवसापासून राज्यात सर्वत्र संततधार सुरु आहे. बुधवारी रात्रभर मुंबईसह राज्यारत सर्वत्र जोरदार पाउस कोसळत आहे. या पावसामुळे मुंबईतली रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतूक सुरळीत सुरु आहे. येत्या २४ तासांत मुंबई, गोवा आणि कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, मराठवाडयातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्याह तीन दिवसापासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. कोयनेचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून धरणातून ९५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोकण किनारपट्टीतही येत्या २४ तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मंगळारी रात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने येथे सकाळी उसंत घेतली नाही. रत्नागिरीत रिमझीम बरसणारा पाऊस हा दक्षिण भागात जोरदार कोसळतो आहे. तसंच सिंधुदूर्गात मुसळधार बरसणारा पाऊस आता कमी झालाय.

गेल्या दोन वर्षांपासून तहानलेल्या मराठवाड्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे येत्या २४ तासात मराठवाड्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यापैकी हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.एकीकडे वेघशाळेकडून येत्या २४ तासात चंद्रपूर शहरात मुसळधार पावासाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत पडलेल्या धुव्वाधार पावसामुळे नद्यांचे पाणी शहरात शिरले आहे. इरई धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

Leave a Comment