वजन घटवा – सोने कमवा

दुबई दि.१८- वजन घटवा आरोग्य मिळवा हा संदेश आपल्याला चांगला परिचयाचा असतो. वजन घटवण्यासाठी वजनदार व्यक्ती अनेक प्रकारचे उपायही करत असतात. मात्र वजन घटविण्यासाठी स्वतःच खर्च करून हे उपाय करावे लागतात. त्याऐवजी वजन घटविणार्‍यांना सोने बक्षीस मिळणार असेल तर काय होईल ? तर नक्कीच वजन घटविणार्‍यांचा उत्साह द्विगुणित होईल.

मग ऐका तर! दुबईतील महापालिकेने वजन घटविणार्‍यांसाठी सोने बक्षीस योजना जाहीर केली असून महिन्याला एका किलो वजन घटविले तर १ ग्रॅम सोने दिले जाणार आहे. जास्तीतजास्त दोन ग्रॅम सोने दर महिना मिळणार आहे. यूएईमधील नागरिकांची जीवनशैली आर्थिक संपन्नतेमुळे अधिकच आरामदायी झाली आहे. परिणामी मुबलक प्रमाणात फास्ट फूड आणि व्यायामाचा अभाव यामुळे येथील नागरिक लठ्ठ होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यांची जीवनशैली अधिक आरोग्यदायी बनावी आणि आरोग्यावर सरकारला करावा लागत असलेला खर्चही कमी व्हावा यासाठी ही अनोखी योजना महापालिकेने राबविली आहे. शुक्रवारपासून म्हणजे उद्यापासून त्यासाठी दुबईवासी आपली नांवे नोंदवू शकणार आहेत.