सायबर हल्ल्यांपासून रक्षणासाठी मराठा चेंबरची राष्ट्रीय परिषद

पुणे दि. ७ : भविष्यातील संघर्षात सायबर हल्ले अधिक महत्वाचे ठरणार असल्याने त्याबाबत माहिती साठा सुरक्षित ठेवणे तसेच अशा हल्ल्यांपासून रक्षणासाठी उपाययोजना करणे हे मोठे आव्हान असल्याने या विषयाबाबत विचार मंथन करण्यासाठी येत्या २ ६ जुलै रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे संरक्षण दले, संरक्षण मंत्रालयातील विविध विभाग आणि उद्योग यांच्यात समन्वयासाठी राष्ट्रीय पातळीवर परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

चेंबरने याबाबत समन्वयासाठी एक समिती स्थापन केली आहे अशी माहिती देऊन देशमुख म्हणाले की दारुगोळा निर्माण विभाग, संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा, गुणवत्ता हमी महासंचालनालय या संस्थांचे प्रतिनिधी यात सहभाग घेतील. डाटा सिक्युरिटी कौन्सिल आणि नास्कोम ने यासाठी साह्य करण्याचे ठरविले असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय उद्योगांचे प्रतिनिधिही त्यात भाग घेणार आहेत.

इस्तोनिया सारख्या देशात अशा सायबर हल्ल्यामुळे चार दिवस लष्करी यंत्रणा बंद लागली असे उदाहरण देऊन देशमुख म्हणाले की लष्करी आणि नागरी यंत्रणांना सायबर हल्ल्यापासून होणारे धोके, लष्कराची गरज नागरी विभाग कशी पूर्ण करू शकतील , त्यासाठी कोणते प्रशिक्षण गरजेचे आहे आणि कोणते मार्ग वापरावे लागतील यावर परिषदेत चर्चा होणार आहे. यावेळी संबंधित यंत्रणा आणि नवे मार्ग याची माहिती देणारे प्रदर्शन असेल.

Leave a Comment