नरेंद्र मोदींमुळे दोघांची पदे गेली

लखनौ : गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता वाढत चाललेली असतानाच त्यांची स्तुती केल्यावरून एकाला तर निंदा केल्यावरून दुसर्‍याला अशा दोघांना आपली पदे सोडावी लागली आहेत. बहुजन समाज पार्टीचे नेते विजय बहादूर सिंग यांनी दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली होती. नरेंद्र मोदी यांनी हिंदु राष्ट्रवादाचा पुरस्कार केला होता आणि त्यावरून वादळ उठले होते. पंरतु मोदी यांचे हे विधान शंभर टक्के बरोबर असून ते देशाच्या हिताचे आहे असे विजय बहादूर सिंग यांनी म्हटले होते.

मायावती ह्या मोदींच्या विरोधात बोलत असताना त्यांच्याच पक्षाचा एक नेता मोदींची स्तुती करतो यामुळे मायावती चिडल्या आणि त्यांनी सिंग यांना पक्षातून काढून टाकले. विजय बहादूर सिंग हे उत्तर प्रदेशाच्या हमीरपूर मतदारसंघातू लोकसभेवर निवडून आलेले आहेत. दुसर्‍या बाजूला भारतीय जनता पार्टीच्या दिल्ली प्रदेश शाखेचे उपाध्यक्ष अमीर रजाक हुसेन यांना मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका महागात पडली आहे. त्यांनी ही टीका करताच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना जाब विचारला. मात्र नेत्यांच्या या चौकशीला काही उत्तर देण्याच्या ऐवजी अमीर रजा हुसेन यांनी पक्षाचा राजीनामा देऊन टाकला.

अमीर रजा हुसेन यांनी राजीनामा पत्रात मोदी यांच्यावर टीका केल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. परंतु तरीही राजीनामा दिला आहे. देशातले मुस्लीम नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा लालकृष्ण अडवाणी किंवा सुषमा स्वराज यांना पसंती देतील असे मतही हुसेन यांनी आपल्या राजीनामा पत्रात व्यक्त केले आहे. दिल्ली प्रदेश भाजपाचे अध्यक्ष विजय गोयल यांनी हुसेन यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

Leave a Comment