जात पंचायतीचा अजब न्याय

लखनौ : मुलींवर आणि महिलांवर होत असलेल्या अत्याचारामुळे सार्‍या देशात चर्चा होत आहे आणि अशा अपराधात गुंतलेल्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा सुनावली जावी अशी सगळीकडून मागणी होत आहे. परंतु उत्तर प्रदेशातल्या अलीगढ जिल्ह्यातल्या एका गावातील जात पंचायतीने कायदा आपल्या हाती घेऊन आपल्या गावातल्या एका बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपीला खेटराने ५ वेळा मारण्याच्या शिक्षेवर सोडून दिले आहे.

या प्रकरणात एका तरुणाने त्याच गावातल्या एका मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता आणि हे प्रकरण जात पंचायतीपुढे आले. तेव्हा गावातल्या जुन्या जाणत्या पंचांनी एकत्रित बसून चावडीवरचा न्याय दिला. पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपी मुलाला पायातल्या खेटराने पाच वेळा मारावे आणि हे प्रकरण मिटवून टाकावे असा निर्णय त्यांनी दिला. ही शिक्षा अंमलातसुध्दा आणली गेली. मात्र मुलीच्या वडिलांनी याउपरही हे प्रकरण पोलिसांत नेले. तेव्हा ही गोष्ट उघड झाली.

पोलिसांनी या गृहस्थाची फिर्याद लिहून घेतली असून आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या संबंधात जात पंचायत भरवून असा निर्णय देणार्‍या पंचावर मात्र पोलीस काय कारवाई करणार हे कळलेले नाही.