उर्वरित महाराष्ट्र वैधानिकच्या अध्यक्षपदी मदन पाटील

मुंबई – काँग्रेसचे माजी मंत्री मदन पाटील यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी याबाबतची घोषणा केली.

मदन पाटील यांची ही नेमणूक म्हणजे काँग्रेसच्या सांगली महापालिकेतील विजयाचे बक्षीस असल्याची चर्चा आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस
पुरस्कृत महाआघाडीने सत्ता मिळवली होती. त्यामुळे दहा वर्षे पालिकेवर सत्ता बाळगून असलेले मदनभाऊ काही काळ सत्तेतून बाजूला पडले होते. मात्र, आता मदन पाटील यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे.

या नेमणुकीमुळे सांगली जिल्ह्याला आणखी एक लाल दिव्याची गाडी मिळणार आहे.