अमित शहा येणार पुन्हा अडचणीत

नवी दिल्ली्- इशरत जहॉं बनावट चकमक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दाखल केलेल्या आरोपपत्रात अमित शहा आणि पोलिस अधिका-यांमधील संभाषणाचा समावेश करण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे विश्वासू अमित शहा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हेडलीने दिलेली माहिती जाहीर करता येणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगमी काळात हेडलीने दिलेली माहिती आता एनआयएच्या अहवालानंतरच उघड होईल.

इशरत जहॉ प्रकरण घडले त्या वेळेस अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते. त्या वेळेस शहा आणि पोलिस अधिका-यांमध्ये झालेले संभाषण रेकॉर्ड असलेला पेन डाईव्ह सीबीआयने आरोपपत्रासोबत न्यायालयात सादर केला आहे. पोलिसांचा गैरवापर केल्या प्रकरणी हा पुरावा म्हणून जोडण्यात आलेला आहे.

एनआयने यासंदर्भात अद्याप अहवाल दिलेला नाही, असे केंद्रीय गहमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. सूत्रांच्या माहितीनुसार, डेव्हीड हेडलीने २०११ मध्ये इशरत जहाँबाबत उल्लेख केला होता. ती लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी असल्याचे हेडलीने एफबीआयला सांगितले होते, असा दावा काही जण करीत आहेत. शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळले त्यामुळे एनआयएचा अहवाल यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Leave a Comment