न्यूयॉर्क – जगातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा अधिकार हवा. अज्ञान, गरिबी, अन्याय आणि दहशतवाद या सर्व समस्यांचे उत्तर शिक्षणातून मिळू शकते, असे परखड मत अल्पवयीन मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिने संयुक्त राष्ट्रातील आपल्या भाषणात व्यक्त केले. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा अधिकार असल्याने जगातील प्रत्येक राष्ट्राने मोफत
मूलभूत शिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मलालाने केले. मलालाच्या भाषणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. भाषणाचा समारोप होताच सर्व सदस्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत मलालाचे कौतुक केले.
महिला शिक्षणाची आयकॉन ठरलेली पाकिस्तानची कन्या मलाला युसूफजई हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 12 जुलै रोजी न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ’मलाला दिन’ साजरा करण्यात आला. मात्र मलाला दिन हा माझा नसून जगातील प्रत्येक महिला, बालक यांचा दिवस आहे, असे सांगत या 16 वर्षीय मानवाधिकार कार्यकर्तीने शांतता, शिक्षण आणि समानतेचा पुरस्कार करण्यासाठी जागतिक संघटनांना एकजुटीचे आवाहन केले. एक पुस्तक, एक लेखणी, एक व्यक्ती यामध्ये सारे जग बदलण्याचे सामर्थ्य आहे. दहशतवाद्यांनी इस्लामचा गैरवापर करत अनेक निरपराध नागरिकांचे बळी घेतले आहेत, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. मी देखील या दहशतवादाची बळी ठरले आहे.
गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी तालिबान्यांनी माझ्यावर गोळया झाडून मला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु माझ्या कठीण समयी सार्या जगाने माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे मी आज हजारोंचा आवाज बनून येथे उभी आहे. तालिबान्यांविरोधात मला व्यक्तिगत आकस नाही; परंतु त्यांच्या शिक्षणाला विरोध करणार्या प्रवृत्तीला माझा विरोध आहे. तालिबान्यांच्या मुलांनाही शिक्षण मिळावे अशी माझी इच्छा आहे. महात्मा गांधी, मदर तेरेसा अशा महान व्यक्ती आणि माझ्या आई-वडिलांकडून मी हेच शिकले आहे, असे मलाला यावेळी म्हणाली.
पाकिस्तान हा शांतताप्रिय नागरिकांचा देश आहे. परंतु काही कट्टरवादी इस्लामचा गैरवापर करत शिक्षणाला विरोध करत आहेत. त्यांचा प्रामुख्याने महिला शिक्षणाला विरोध आहे. भारतातही आजही हजारो-लाखो मुले बालकामगार म्हणून काम करत आहेत. नायजेरिया सारख्या देशात अनेक शाळा उद्ध्वस्त केल्या जात आहेत. अफगाणिस्तानमध्ये तर महिला, मुलींची अवस्था फारच बिकट आहे. त्यामुळे आता महिलांनीच आपल्या अधिकारासाठी आवाज उठविण्याची गरज जागतिक व्यासपीठावरून मलालाने व्यक्त केली. संयुक्त राष्ट्राचे महासचिव बान की मून यांच्यासह जगभरातील अनेक नेते या मलाला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित होते. 12 आणि 13 असा दोन दिवस हा कार्यक्रम चालणार आहे. पाकिस्तानातील तालिबान्यांनी आपल्या वर्चस्वाखालील स्वात खोर्यात मुलींच्या शिक्षणावर 2009 मध्ये प्रतिबंध लावल्यानंतर युसूफजईने ब्लॉगवरून आवाज उठवत दहशतवाद्यांच्या धमकीला भीक न घालता मुलींना शिकत राहण्याचे आवाहन केले होते. यामुळे चिडलेल्या तालिबान्यांनी गेल्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी तिच्यावर गोळीबार करत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता.