ड्रायव्हरविना कारच्या गर्दीच्या रस्त्यांवर होणार चाचण्या

लंडन दि.१७ – स्वतःच चालणार्‍या आणि चालकाची गरज नसणार्‍या पहिल्या विनाचालक कारची चाचणी ब्रिटनमधील गर्दीच्या रस्त्यांवर या वर्षअखेर घेण्यात येणार आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी जपानी बहुराष्ट्रीय कार उत्पादक कंपनी निस्सानच्या सहकार्याने ही कार तयार केली असून तिच्या खासगी रस्त्यावर सायन्स पार्क येथे घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. आता गर्दीच्या रस्त्यावर या कार चालविण्यासाठी वाहतूक विभागाकडून परवानगी मिळविण्यात आली असल्याचे समजते.

गर्दीच्या रस्त्यावर या कारच्या चाचण्या घेताना सध्या सुरक्षेचा उपाय म्हणून चालकाच्या मागच्या सीटवर एक ड्रायव्हर तैनात करण्यात येणार आहे. सध्या या कार कमी गर्दी असलेल्या, ग्रामीण भागात तसेच शहरी उपनगरात टेस्ट केल्या जाणार आहेत. नेहमीच्या माहितीच्या रस्त्यावर धावू शकणारी रोबो कार यापूर्वीच तयार केली गेली आहे. आता या विनाचालक व इलेक्ट्रीक कार साठी यूके सरकार ५०० दशलक्ष पौंडांची तरतूद करण्याचा विचार करत असल्याचेही समजते.

सर्च इंजिन गुगलने या विनाचालक कार सॅन फ्रान्सिस्कोमध्ये यशस्वीरित्या चालविल्या असून त्यांनी या कारमधून १,६०,९३४ किमी अंतर पार केल्याचे सांगितले जात आहे. कॅमेरा, रडार आणि लेझर सेन्सरचा वापर या कारच्या तंत्रज्ञानात करण्यात आला आहे.