जम्मू – भारत-पाकिस्तान सीमेवर अडीचशे ते तीनशे पाकिस्तानी अतिरेकी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असून योग्य संधीची वाट पहात आहेत, अशी खळबळजनक माहिती भारतीय लष्कराच्या १९ व्या कॉर्पस्चे मुख्य अधिकारी लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. जम्मू भागात सीमा भागातील रस्ते विकास संघटनेतर्फे उभारण्यात आलेल्या एका पुलाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.
हा पूल २२० मीटर लांबीचा असून तो लढाईच्या वेळी उपयोगात येणारा आहे. त्यावर १२ कोटी ५० लाख रुपये खर्च आलेला आहे. त्याचे उद्घाटन ले. ज. हुडा यांच्या हस्ते झाले. तेव्हा बोलताना त्यांनी या संभाव्य घुसखोरीसंबंधी इशारा दिला. हे अतिरेकी दहा ते वीसच्या गटांमध्ये संघटित असून भारतात घुसण्याची संधी शोधत आहेत. त्यांचा भर पुंछ भागातून भारतात घुसण्यावर आहे, असे ते म्हणाले.
भारत-पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय तळांना लक्ष्य करून त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रकार वाढले आहेत. असे हल्ले करून आपली तटबंदी विस्कळीत करणे आणि त्यातून निर्माण होणार्या गैरव्यवस्थेचा फायदा घेऊन भारतात घुसखोरी करणे असा त्यांचा प्रयत्न आहे, असे हुडा यांनी सांगितले. आतापर्यंत तरी त्यांच्यापैकी कोणालाही भारतात घुसण्याची संधी मिळालेली नाही. जिथे त्यांनी तसा प्रयत्न केला तिथे त्यांना अटकाव करण्यात आला, एवढेच नव्हे तर घुसखोरी करणार्या अतिरेक्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले असे ते म्हणाले.
प्रत्यक्ष ताबा रेषेवरून भारतात घुसखोरी करण्याचे प्रकार गतवर्षी पेक्षा यंदा वाढले आहेत. मात्र भारतीय लष्कराने प्रत्यक्ष ताबा रेषेवरची आपली उपस्थिती वाढवली आहे. या प्रसंगी पत्रकारांनी ले. ज. हुडा यांना काश्मीरमधील विशेष लष्करी कायदा हटविण्याच्या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या मागणीविषयी विचारले असता त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला.