मुंबई – स्थानिक विकास निधी वाटपात अन्याय होत असल्याच्या मुद्दयावर आक्रमक पवित्रा घेत विरोधकांनी आज विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज पहिल्यांदा तीन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विकासनिधी वाटपात घेतला हात धुवून!
विधानसभेचे कामकाज सुरु होताच अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. त्याआधीपासूनच विरोधी पक्षाचे सदस्य अध्यक्षांच्या आसना समोरील मोकळया जागेत जमा झाले होते. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी स्थानिक विकास निधी वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी उदयोग मंत्री नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी खडसे यांना बोलू देण्यास आक्षेप घेतला. तेव्हा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे काय आहे ते ऐकून घेऊ. असे सांगितले.
आधी विरोधी सदस्यांना जागेवर बसू द्या नंतर खडसेंना बोलू द्या, असे राणे व भुजबळ यांचे सांगणे होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हरकत घेतली तेव्हा मोकळ्या जागेत जमा झालेले विरोधी पक्षाचे सदस्य तेथेच ठाण मांडून बसले. तेव्हा राणे व भुजबळांनी या सदस्यांना जागेवर पाठवा. अशी मागणी अध्यक्षांकडे केली.
भुजबळ म्हणाले की अहो, ज्या आमदारांचे हे नेते आहेत, तेच समोर असे खाली बसलेले असताना विरोधी पक्ष नेत्यांना कसे काय बोलता येईल? त्यानंतर अध्यक्षांनीही वारंवार विरोधी सदस्यांना जागेवर बसण्याचे आवाहन केले. मात्र हे सदस्य उठले नाहीत. विकास निधीचे समान वाटप करून विरोधी पक्षाच्या आमदारांवरील अन्याय दूर करा. अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली.
त्यावेळी विरोधी पक्ष सदस्यांनी ही मागणी लावून धरत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळामुळे कामकाज करणे अशक्य झाल्याने अध्यक्षांनी विधानसभा प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत तहकूब केली. सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाले तेव्हा गदारोळ कायमच होता. यामुळे उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी अर्धा तासासाठी, नंतर दोन वाजेपर्यंत व त्यानंतर दिवसभरासाठी विधानसभा तहकूब केली.