सोल दि.१६ – अमेरिकेच्या लष्करी गुपितांचा भांडाफोड करणार्या विकिलिक्स आणि एडवर्ड स्नोडेन यांच्यापासून धडा घेऊन दक्षिण कोरियाने त्यांच्या संरक्षण मंत्रालयातील कर्मचार्याना एक विशेष स्मार्टफोन अॅप बसविणे बंधनकारक केले आहे. स्मार्टफोनच्या मु्ख्य कार्यातच एक विशेष तंत्र विकसित करून बनविल्या गेलेल्या या अॅपमुळे संरक्षण मंत्रालयातील महत्त्वाची लष्करी गुपिते कर्मचारी लिक करू शकणार नाहीत असे सांगितले जात आहे.
मोबाईल मॅनेजमेंट डिव्हाईस या नावाच्या या अॅपमुळे स्मार्टफोनचा कॅमेरा सुरू होऊ शकत नाही तसेच आडिओ रेकॉडिगलाही प्रतिबंध केला जातो असे संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते किम मिन सिओक यांनी सांगितले. ते म्हणाले संरक्षण विभागातील १५०० कर्मचार्याना हे अॅप ते कार्यालयात कामावर येताना बसविणे बंधनकारक केले गेले आहे. यामुळे संरक्षण मंत्रालयातील महत्त्वाची गुपिते बाहेर लिक होणार नाहीत. तसेच बाहेरच्या लोकांनाही संरक्षण मंत्रालयातील अधिकार्याच्या उपकरणांचे हॅकींग करण्यापासूनही हे अॅप संरक्षण देऊ शकणार आहे.
सध्या हे अॅप फक्त संरक्षण मंत्रालयाच्या परिसरातच वापरणे शक्य आहे मात्र लवकरच ते सैनिकांसाठीही उपलब्ध करून दिले जाणार आहे.