केदारनाथ: उत्तराखंडमध्ये आलेल्या महाप्रलयाला मंगळवारी एक महिना पूर्ण झाला आहे. याठिकाणी महिनाभरपासून ५ हजार ७४८ नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी दिली. यामध्ये महाराष्ट्रातील १५८ भाविक अजूनही बेपत्ता आहेत.
महिनाभरानंतरही उत्तराखंडमधील ५ हजार ७४८ नागरिक बेपत्ता
महाप्रलय येवून एक महिना उलटला तरी केदारनाथ मंदिराची अजूनही सफाई करण्यात आली नाही. गौरीकुंड ते केदारनाथपर्यंत पायवाट तयार होत नाही तोपर्यंत मंदिराची पूजा केली जाणार नसल्याचे उत्तराखंडचे कृषीमंत्री हरक सिंह रावत यांनी स्परष्टी केले आहे. ही पायवाट तयार होण्यासाठी १० ते १५ दिवसांचा काळ लागणार असल्याचेही रावत यांनी सांगितले.
दरम्यान बेपत्ता भाविकांच्या नातेवाईकांना मंगळवारपासून नुकसानभरपाई दिली जाणार आहे. मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री बहुगुणा यांनी सांगितले. आगामी काळात केदारनाथला जाण्यासाठी केबलकारचा वापर करण्याचा प्रस्ताव देणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.