मंडेलांच्या ९५ व्या वाढदिवसासाठी जगभरात कार्यक्रम

जोहान्सबर्ग दि.१६ – रूग्णालयात व्हेंटीलेटरवरच असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांचा ९५ वा वाढदिवस जगभरात साजरा केला जाणार आहे. येत्या गुरूवारी म्हणजे १८ जुलैला हा वाढदिवस असून त्यासाठी अनेक देशांत वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुर्देवाने मंडेला मात्र रूग्णालयातच उपचार घेत असल्याने या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाहीत. १९९४ साली ते पहिले ब्लॅक प्रेसिडेंट म्हणून निवडले गेले होते.

नेल्सन मंडेला यांनी आपल्या समाजबांधवांच्या उन्नतीसाठी जन्मभर केलेल्या प्रयत्नांचे मोल करणे अवघड आहे. मात्र त्यांनी आयुष्यातली ६७ वर्षे केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांच्या या वाढदिवशी प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील किमान ६७ मिनिटेतरी समाज कार्यासाठी द्यावीत असे ठरविले गेले आहे. युनायटेड नेशन्सने २०१० मध्ये मंडेलांचा वाढदिवस जगभर मंडेला दिवस म्हणून साजरा केला जावा असे जाहीर केले होते. शांततेसाठी मंडेला यांना नोबल पारितोषिकाने गौरविले गेले आहेच. पण त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातील लोकांना समाजकार्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी आशाही व्यक्त केली गेली आहे.

गुरूवारी दक्षिण आफ्रिकेच्या शाळेतील सर्व विद्यार्थी दिवसाची सुरवात मंडेलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन करणार आहेत. मंडेलांच्या जन्मगावी उभारण्यात आलेल्या नेल्सन मंडेला लिगसी ब्रिजचे उद्घाटनही केले जाणार आहे. याच दिवशी मंडेला यांच्या नावानेच विज्ञान शाळा सुरू होत आहे. यूएस मधील १७ शहरात तसेच ऑस्ट्रेलिया, नॉर्वे येथेही अनेक कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.

Leave a Comment