भाजपा, कॉंग्रेसचा भावनांचा खेळ सुरू – मायावती

लखनौ – २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका जस जशा जवळ येत आहेत, तस तसे भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसचे नेते अयोध्येच्या प्रश्‍नावरून पुन्हा राजकारण खेळत आहेत आणि जनतेच्या भावना भडकवत आहेत. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीची स्वत:हून दखल घ्यावी, अशी मागणी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. देशाची धर्मनिरपेक्षता टिकविण्यासाठी या भावनेच्या राजकारणावर न्यायालयाने बंधन घालावे, असे मायावती यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषद या संघटनांवर बंदी घालावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

भारतीय जनता पार्टी आणि कॉंग्रेसच्याही नेत्यांनी अलीकडच्या काळात ज्या भावनेने अयोध्या आणि ङ्गैजाबादला भेटी दिल्या आहेत ती भावना हिंदू आणि मुस्लीम मतदारांचा अनुनय करण्यासाठी आहे, असाही आरोप मायावती यांनी केला. आपल्या देशामध्ये जातीयवादी संघटना धार्मिक भावनांना खतपाणी घालत आहेत. परंतु त्यांचे हे कृत्य भारतीय घटनेने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाशी विसंगत आहे, असे मायावती यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

मायावती यांनी बसपाचे भूतपूर्व नेते बाबुलाल कुशवाह यांंना मुलायमसिंग यादव जवळ करत आहेत याबद्दल खेद व्यक्त केला. बोधगयेतील स्ङ्गोटांना केंद्र सरकारच जबाबदार आहे, असाही आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशातल्या समाजवादी पार्टीच्या नेत्यांना राज्यात कायदा सुव्यवस्था स्थिती राखता आली नाही म्हणून या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणीही त्यांनी केली. उत्तर प्रदेशात अलाहाबाद उच्च न्यायालयाने जातीय मेळाव्यांना बंदी घातली आहे. याविषयी बोलताना मायावती यांनी, आपली हे मेळावे विविध जातींमध्ये बंधुभाव वाढविण्यासाठी आयोजित केले जात आहेत असा खुलासा केला. या मेळाव्यामुळे जातीय कलह वाढत नाही. त्यामुळे त्यांच्याकडे विधायक दृष्टीकोनातून पाहिले जावे आणि त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्याची प्रशंसा केली जावी असे प्रतिपादन त्यांनी केले.

Leave a Comment