गंभीर-सेहवाग पुनरागमन करतील

मुंबई- टीम इंडियाचा नवीन सलामीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे टीम इंडियाने दोन मालिका जिंकल्या आहेत. तरी पण येत्याच काही दिवसात वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर ही माजी सर्वोत्तम सलामीवीर पुन्हा क्रिकेटमध्ये परततील, असा विश्वास निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक बोलताना किरण मोरे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून वाढती स्पर्धा हे टीम इंडियाच्या क्रिकेटसाठी चांगले लक्षण आहे. सध्या फॉर्म आणि फिटनेसमुळे सेहवाग, गंभीर तसेच झहीर खान संघाबाहेर आहेत. मात्र आगामी काळात त्यांचे पुनरागमन होईल. प्रत्येक क्रिकेटपटूच्या कारकीर्दीत ‘बॅडपॅच’ येतो. मात्र सध्या संघाबाहेर असलेल्या सिनियर्सनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी. स्वत:वर विश्वास खूप महत्त्वाचा. त्यामुळे सेहवाग, गंभीर आणि झहीरने ठरवले तर त्यांना पुनरागमन करता येईल.

नुकत्याच झालेल्या चँपियन्स ट्रॉफी आणि तिरंगी मालिकेत भारताने सलामीसाठी शिखर धवन आणि रोहित शर्माचा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी ठरला. धवन-रोहित या नव्या डाव्या-उजव्या सलामी दुकलीची मोरे यांनी प्रशंसा केली आहे. आगामी वनडे वर्ल्डकप पाहता भारतासमोर तेज मा-याची समस्या आहे. भारताला चांगल्या वेगवान गोलंदाजांची आवश्यकता आहे. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव ही युवा जोडगोळी प्रभावी ठरते आहे. मात्र त्यांना साथ देतील, असे पर्यायी गोलंदाज हवेत, असेही मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment