एटीएस करतेय राज्यातील धार्मिक स्थळांचे सुरक्षा ऑडिट

मुंबई दि.१५ – देशातील नागरिकांच्या धार्मिक भावना भडकावून अशांतता आणि गोंधळाचे वातावरण करण्याचा मार्ग दहशतवादी संघटना चोखाळू लागल्या असल्याची नोंद घेऊन राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचे सुरक्षा ऑडिट करण्याचे काम हाती घेतले असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

बोधगयेत झालेल्या स्फोटांनंतर देशातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सुरक्षेचे कोणते उपाय केले गेले आहेत याची तपासणी केली जात आहे. पुण्यातील दगडूशेठ गणपती, चतुःश्रृंगी मंदिर, पंढरपूर विठोबा, तुळजापूरची तुळजा भवानी, कोल्हापूरची अंबाबाई या मंदिरांचे सुरक्षा ऑडिट पूर्ण केले गेले असल्याचे सांगून हे अधिकारी म्हणाले की सुरक्षेत ज्या त्रुटी आढळतील त्यावर उपाय सुचविले जाणार आहेत.

दोन महिन्यापूर्वीच दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकार्यांरनी राज्यातील बहुतेक महत्त्वाच्या धार्मिक स्थळाना भेटी देऊन तेथील सुरक्षेची पाहणी केली आहे. त्यात नागपूर दीक्षाभूमी, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, नांदेड येथील विष्णपुरी धरण यांचा समावेश आहे.

दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व स्थळांसाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. त्यात सुरक्षा रक्षकांची संख्या, मंदिराला असलेले मार्ग, सीसीटिव्ही आहेत का, अग्निशमन यंत्रणा अशी अनेक मुद्द्यावरची माहिती विचारली गेली आहे. यामुळे दहशतवाद विरोधी पथकाकडे दहशतवादी हल्ला झालाच तर त्या स्थळाची पूर्ण माहिती असेल आणि संबंधित स्थळालाही असा हल्ला झालाच तर सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे कशी राबवायची याचा सल्लाही मिळू शकणार आहे.

Leave a Comment