इराण रुपया स्वीकारणार

इराण – इराणचे सरकार भारताला विकल्या जाणार्‍या खनिज तेलाचे पैसे आता पूर्णपणे रुपयात स्वीकारण्यास तयार झाले आहे. सरकारने कालच ही घोषणा केली. पूर्वी इराणकडून भारताला पुरविल्या जाणार्‍या तेलाचे पेमेंट पूर्णपणे रुपयात केले जात नव्हते. भारत या पेमेंटचा ४५ टक्के हिस्सा रुपयाच्या चलनात देत होते, मात्र ५५ टक्के हिस्सा हा अन्य चलनात दिला जात होता. आता मात्र पूर्ण १०० टक्के पेमेंट रुपयात स्वीकारण्याची तयारी इराणने दाखवली आहे.

वास्तविक पाहता जगभरातल्या सर्व देशांचे खनिज तेलाचे पेमेंट डॉलरमध्ये केले जाते. परंतु इराण अणुबॉम्ब तयार करत असल्याची शंका आल्यावरून अमेरिकेने इराणच्या तेलासाठीचा डॉलरचा पुरवठा बंद केला आहे. भारतात आयात केल्या जाणार्‍या खनिज तेलामध्ये इराणमधून येणार्‍या तेलाचा मोठा हिस्सा असतो. मात्र भारत या तेलाचे पैसे डॉलरमध्ये देऊ शकत नव्हता. भारताच्या पेमेंटचा ४५ टक्के हिस्सा कोलकत्ता येथील युको बँकेमार्ङ्गत रुपयाच्या चलनात दिला जात होता आणि ५५ टक्के हिस्सा यूरोपियन संघाच्या चलनात म्हणजे यूरोमध्ये तुर्कस्तानातील अंकारा येथील हाक बँकेतून दिला जात होता.

अमेरिकेच्या दबावाला बळी पडून तुर्कस्तानने ही सेवा बंद केली. त्यामुळे भारताला आणि इराणलाही यूरोची देवाण-घेवाण करण्यामध्ये अडचणी यायला लागल्या. त्याला पर्याय म्हणून रशियाच्या चलनात म्हणजे रुबलमध्ये ही देवाण-घेवाण करता येईल का याचा विचार केला गेला. परंतु त्यातही यश आले नाही. म्हणून शेवटी इराणला सुद्धा यूरो मधील पेमेंट कसे द्यावे याचा मार्ग तिथल्या सरकारला सुचविता आला नाही. शेवटी तिथल्या सरकारने हे पैसे रुपयात स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.

Leave a Comment