असिफ अली झरदारी पाकिस्तान सोडणार ?

इस्लामाबाद दि.१५ -पाकिस्तानचे राष्ट्रपती आणि माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचे पती असिफ अली झरदारी सुरक्षेचा कारणास्तव पाकिस्तानचा त्याग करून परदेशात कायमस्वरूपी राहण्यास जाणार असल्याचे वृत्त आहे. येत्या आठ सप्टेंबरला त्यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल पूर्ण होत आहे. पुन्हा निवडणूक लढविणार नसल्याने त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

झरदारी आणि त्यांच्या कुटुंबाला पाकिस्तानात धोका आहे. त्याचबरोबर राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल संपल्यानंतर त्यांच्याविरोधातील भ्रष्टचाराची प्रकरणे पुन्हा उकरली जाण्याची भीतीही झरदारी यांना आहे. त्यामुळे पाकिस्तान सोडून जावे असा सल्ला त्यांच्या मित्रांनी त्यांना दिला आहे. झरदारी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या स्वित्झर्लंड भ्रष्टाचार प्रकरणाची सुनावणी नुकतीच सुरू केली आहे.

झरदारी यांच्या मुख्य सुरक्षा रक्षकाची नुकतीच हत्या करण्यात आली आहे. यापूर्वीही २००८ साली कराचीतील त्यांच्या घराबाहेर त्यांचे सुरक्षा अधिकारी खलिद शहनशाह यांना ठार केले गेले होते तर २०११ सालीही अन्य सुरक्षा रक्षक इम्रान जंगी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सध्या झरदारी राष्ट्रपती असल्याने त्यांना सुरक्षेचे विशेषाधिकार आहेत मात्र एकदा हे पद गेले की त्यांची सुरक्षा कमी होणार आहे. परिणामी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवाला असलेला धोका वाढणार आहे. असे त्यांच्या सल्लागारांचे म्हणणे आहे.

झरदारी यांनाही या बाबीची जाणीव आहे. त्यामुळेच गेली पाच वर्षे ते सार्वजनिक कार्यक्रमात अगदी मोजक्या वेळाच सामील झाले आहेत. पद गेल्यानंतर त्यांनी देश सोडणे हेच योग्य असल्याचे त्यांच्या वकीलांचेही म्हणणे आहे. परदेशातूनच ते देशात पक्षाचे नियंत्रण करू शकतील असा सल्ला त्यांना दिला गेला आहे असे पीपीपीचे नेते एतजाज अहसन यांनी सांगितले.

Leave a Comment