महागाईची झळ श्रीमंतांना नाहीच

नवी दिल्ली दि.१५- केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आर्थिक मंदी जाणवत असतानाही भारतातील श्रीमंत आणि अधिक पैसा कमावणारी मंडळी बेफाट खर्च करत असल्याचे व महागड्या ब्रँडेड वस्तूंची खरेदी भरपूर प्रमाणात करत असल्याचे उद्योग संस्था असोचेमने केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ही मंडळी कमाईचा १/३ इतका भाग चैनीच्या वस्तूंवर खर्च करत असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले आहे.

भारतात गरीब आणि मध्यमवर्ग महागाईच्या झळा सोसत आहे. त्यामुळे नाईलाजाने या वर्गाला काटकसर करूनच महिन्याचा खर्च भागवावा लागत आहे. मात्र त्याचवेळी अतिश्रीमंत आणि चांगले पगारदार यांच्या चैनीच्या वस्तूंच्या खरेदीत वाढच होत असल्याचे दिसून आले आहे. उच्च दर्जाची लाईफ स्टाईल हा त्यांच्या सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग असल्याचे मत त्यातील कांही जणांनी व्यक्त केले आहे. कारण समाजातील स्थानानुसारच त्यांना राहावे लागते असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या या भरमसाठ खरेदीमुळे देशात लक्झरी उद्योगव्यवसायातही वाढ नोंदविली गेली आहे असे असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले.

हे सर्वेक्षण दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैद्राबाद, पुणे, अहमदाबाद आणि चंदिगढ या शहरात करण्यात आले आणि त्यात २०० उच्च कमाईदारांचा समावेश करण्यात आला होता. त्यात सर्वाधिक खर्च करण्यात दिल्ली आघाडीवर असल्याचे तर मुंबई दोन नंबरवर असल्याचेही दिसून आले. यातील ८५ टक्के लोकांनी परदेशात अधिक खरेदी करत असल्याचे सांगितले. श्रीमंत महिला वर्गही या खरेदीत मागे नाही. महिलांची खरेदी मुख्यतः सौदर्य प्रसाधने, घड्याळे, बॅगा, चपला, दागिने , परफ्युम आणि कपडे यांची आहे तर पुरूष महागडे मद्य, घड्याळे व वाहनांवर अधिक खर्च करत असल्याचेही समजले. हॉटेल, रिसॉर्ट व रेस्टॉरंटवर खर्च करण्यात महिला व पुरूष दोघांचेही प्रमाण जवळजवल सारखेच आहे.

Leave a Comment