ज्येष्ठ लेखिका माधवी देसाई यांचे निधन

बेळगाव – ज्येष्ठ लेखिका माधवी देसाई यांचे बेळगावच्या भागीनगर या त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 80 वर्षांच्या होत्या. त्या प्रसिद्ध नाटककार भालजी पेंढारकर यांच्या कन्या होत्या. माधवी ताई बरेच वर्षे गोव्यातही राहत होत्या. मात्र गेल्या काहीमहिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामूळे बेळगावमध्ये त्यांची कन्या मिरा तारळेकर यांच्या घरी राहत होत्या.

वृद्धापकाळाने त्यांचे सोमवारी सकाळी साडेचार वाजता निधन झाले. बेळगावमध्ये मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी त्यांचा सखोल अभ्यास होता. बेळगावच्या करोली गावात पहिले सीमावर्ती मराठी साहित्य संमेलन भरवण्यात त्यांची भूमिका मोठी होती. त्यांनी उचललेल्या या पाऊलामुळे आज सीमावर्ती भागात ठिकठिकाणी मराठी साहित्य संमेलने भरवण्यात येत आहेत.

माधवी ताई यांचे पती रणजित देसाई यांच्यासोबत असलेल्या नातेसंबंधांवर आधारित नाच गं घुमा’ हे त्यांचे गाजलेले आत्मचरित्र आहे. सोलापूरमधील भैरुरतन दमानी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. त्याशिवाय सीमावर्ती भागातील अनेक साहित्य क्षेत्रातील पुरस्कार त्यांना त्यांच्या योगदानाबद्दल मिळाले आहेत. माधवी देसाईंच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

Leave a Comment