चोरीचा मेसेज देणारी गोदरेजची तिजोरी

मुंबई दि.१५- घरातल्या तिजोरीत महत्त्वाचे कागदपत्र आहेत, मौल्यवान वस्तू आहेत त्यामुळे चोरांची भीती सतत असते असे म्हणण्याचा काळ आता इतिहासजमा होणार आहे. भरभककम आणि खात्रीशीर तिजोरी बनविणारे म्हणून ओळख असणार्‍या गोदरेज कंपनीने आय वॉर्न या तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारात आणलेली नवी तिजोरी तिला मालकाशिवाय दुसर्‍याचा हात लागलाच तर ताबडतोब अलार्म वाजवेलच पण आधीच नोंदवून ठेवलेल्या दूरध्वनी क्रमांकावर तसा मेसेजही पाठवेल अशी सोय करण्यात आली आहे.

गोदरेज सिक्युरिटी सोल्युशनने आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेली ही तिजोरी त्यामुळे चोरी प्रूफ झाली असल्याचा दावा केला जात आहे. तिजोरीत बसविलेले सेन्सर्स तिजोरी उघडण्याचा प्रयत्न झाल्यास ताबडतोब अलार्म वाजवितात. तसेच मालकाला त्याच्या फोनवर एमएमएस किवा रेकॉर्डेड व्हॉईस मेसेजही पाठवितात. घरात वापरता येईल अशा प्रकारची ही पहिलीच तिजोरी आहे असे कंपनीचे म्हणणे आहे.

कंपनीचे उपाध्यक्ष मेहरनोश पियावाला म्हणाले की मजबूत बांधणी आणि दुहेरी भिती ही आमच्या तिजोर्‍यांची वैशिष्ठ्ये आहेतच. आता त्याला नव्या तंत्रज्ञानाची जोड दिल्याने या तिजोर्‍या अधिक सुरक्षित झाल्या आहेत. नोकरी व्यवसाया निमित्ताने जास्त वेळ घराबाहेर राहणार्‍या लोकांना घरातील मौल्यवान वस्तूंची काळजी नेहमीच वाटत राहते. त्यांच्यासाठी या तिजोर्‍या आदर्श ठरतील.