अणुउर्जेकडे धीमी वाटचाल

गेल्या दोन-तीन वर्षात वादग्रस्त ठरलेला कुडानकुलम अणुउर्जा प्रकल्प अखेर काल सुरू झाला. भारताला पर्यावरणावर परिणाम न करणारी स्वच्छ उर्जा आवश्यक आहे आणि ती अणू प्रकल्पातूनच मिळू शकते. त्यामुळे एका दृष्टीने हा प्रकल्प सुरू झाला ही गोष्ट स्वागतार्ह आहे. परंतु या प्रकल्पात निर्माण होणारी १००० मेगावॉट वीज गृहित धरली तर भारताची एकंदर अणुउर्जा ५८४० मेगावॉट एवढी होत आहे. १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत देशात एकूण १ लाख २० हजार मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित असून त्यातली २० हजार मेगावॉट वीज एकट्या अणुउर्जा प्रकल्पातून होईल असा अंदाज आहे. कुडानकुलमचा अणुउर्जा प्रकल्प हा देशातला २१ वा अणुउर्जा प्रकल्प आहे आणि १२ व्या पंचवार्षिक योजनेच्या शेवटापर्यंत जेवढी अणुउर्जा निर्माण होण्याची गरज आहे त्याच्या केवळ २५ टक्के निर्मिती आता होत आहे. हे आकडे पाहिले म्हणजे अणुउर्जेच्या निर्मितीकडे आपल्याला किती वेगाने वाटचाल करावी लागणार आहे याचा अंदाज येतो. हे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी कुडानकुलम प्रकल्पाचे सर्व टप्पे पूर्ण व्हावे लागतील आणि महाराष्ट्रातील जैतापूरचाही प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा लागेल. पण त्यातही अडथळे आहेतच.

कुडानकुलमचा काल मध्यरात्रीपासून कार्यरत झाला आहे. तामिळनाडूच्या दक्षिण टोकाला समुद्र किनार्‍यावर वसलेल्या या अणुउर्जा प्रकल्पातल्या अपेक्षित असलेल्या सर्व प्रक्रिया यथास्थित पार पडल्या असून येत्या ३० ते ३५ दिवसांत प्रत्यक्षात वीज निर्माण होऊन ती पॉवरग्रीडमध्ये सहभागी केली जाईल आणि दक्षिणेतल्या राज्यांना ती उपलब्ध व्हायला लागेल. या प्रकल्पातून १००० मेगावॉट वीजनिर्मिती होईल. तो तामिळनाडूत असल्यामुळे निर्माण होणार्‍या विजेतील ४६३ मेगावॉट वीज तामिळनाडूला मिळेल. तामिळनाडू सध्या तीव्र वीज टंचाईला तोंड देत आहे. या राज्याला मोठा दिलासा मिळेल. अणुउर्जा प्रकल्प हे केंद्राच्या अखत्यारीतील असतात आणि त्यावर होणारी गुंतवणूक केंद्राची असते. परंतु प्रकल्प ज्या राज्यात असेल त्या राज्याला निर्माण होणार्‍या विजेचा मोठा हिस्सा दिला जातो. त्यानुसार तामिळनाडूला या प्रकल्पातील वीज मोठ्या प्रमाणावर मिळेल. त्याचबरोबर कर्नाटक आणि केरळ याही दोन राज्यांना या विजेचा लाभ होईल. कुडानकुलम प्रकल्पाचा आता कार्यान्वित होत असलेला टप्पा पहिला टप्पा आहे. अजून तीन टप्पे पूर्ण होणार आहेत आणि त्यातून चार हजार मेगावॉट वीज निर्मिती होणार आहे.

आता पहिल्या टप्प्यावर १७ हजार कोटी रुपये गुंतवणूक झाली आहे. दुसर्‍या टप्प्यावर साधारण तेवढीच गुंतवणूक होईल. तिसर्‍या आणि चौथ्या टप्प्यावर ४० हजार कोटी रुपये गुंतवणूक होईल. कुडानकुलमचा हा प्रकल्प ङ्गार प्रलंबित राहिला. १९८४ साली त्या संबंधात पहिली बैठक झाली आणि प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू व्हायला २७ वर्षे लागली. या प्रकल्पात रशियातील तंत्रज्ञान वापरले गेले आहे आणि या तंत्रज्ञानासाठी आवश्यक अशी जनित्रे रशियातच तयार झाली आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या पूर्ततेबाबत आपल्याला रशियावर अवलंबून रहावे लागले. सुरूवातीला रशियात साम्यवादी राजवट संपुष्टात आली आणि त्या देशाला राजकीय अस्थैर्याने घेरले आणि या सर्व संकटावर मात करत तो आता पूर्ण झाला आहे. त्याच्या आड आलेली सगळी विघ्ने संपली आहेत. अशाच प्रकारची विघ्ने आता महाराष्ट्रातल्या जैतापूरच्या अणुउर्जा प्रकल्पाच्या वाटेत आली आहेत. जैतापूरचा प्रकल्प जर कुडानकुलमपेक्षा मोठा आहे आणि त्यातली बरीच वीज महाराष्ट्राला मिळणार आहे. सध्या महाराष्ट्रात ङ्गारसे भारनियमन राहिलेले नाही वीज टंचाईच्या काळात ते साधारणतः २००० मेगावॉट ते ३१०० मेगावॉट एवढे असते. परंतु जैतापूरची वीजनिर्मिती १० हजार मेगावॉट एवढी अपेक्षित असून तो भारतातला सर्वात मोठा अणुउर्जा प्रकल्प होणार आहे. म्हणजे त्यातून महाराष्ट्राला ४ हजार मेगावॉट वीज मिळू शकते.

त्यातून महाराष्ट्राचा विजेचा तुटवडा संपुष्टात येऊन महाराष्ट्र हे विजेच्या बाबतीत सरप्लस राज्य होऊ शकते. एवढी क्षमता असणारा हा प्रकल्प केवळ काही लोकांच्या आडमुठ्या विरोधामुळे प्रलंबित पडायला लागला आहे. सुदैवाने या प्रकल्पाखाली जमिनी जाण्याने विस्थापित होणार्‍या जमीन मालकांनी जमिनी देण्यास मंजुरी दिली आहे. मात्र काही लोकांच्या राजकीय विरोधामुळे प्रकल्प प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. असा विरोध चुकीचा असतो कारण त्याची ङ्गार मोठी किंमत चुकवावी लागते. अशा प्रकल्पाची ही रडतरखडत पूर्ण झालेली कहाणी ऐकल्यानंतर काहीवेळा मनामध्ये असा प्रश्‍न निर्माण होतो की आपण जर याच गतीने प्रगती करणार असू तर आपण महाशक्ती व्हायला किती शतके लागतील आणि तोपर्यंत सारे जग कुठपर्यंत गेलेले असेल? भारतातली नोकरशाही आणि प्रशासन व्यवस्था हा एक सुस्थ अजगर आहे असे पंडित नेहरू म्हणत असत. हा अजगर जोपर्यंत हलणार नाही तो पर्यंत देशाची प्रगती अशक्य आहे असे त्यांना वाटत असे. पंडित नेहरू यांनी आपल्या देशातल्या या व्यवस्थेला कसे चांगले ओळखले होते हे लक्षात येते.

Leave a Comment