पुणे, दि. 14 – प्रगत देशात प्रत्येक संशोधनाला महत्त्व दिले जाते. त्यावर आधारित राष्ट्रीय धोरण ठरविले जाते किंवा विकास केला जातो. त्याप्रमाणे राष्ट्र उभारणीसाठी मनुष्यबळ विकास व संशोधनावर भर देण्याची गरज आहे, असे मत गुजरात राज्याचे मुख्यमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केले. फर्ग्युसन महाविद्यालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या ऍम्पीथिएटरचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष विकास काकतकर, प्राचार्य रवींद्रसिंह परदेशी, भाजपचे राष्ट्रीय चिटणीस शाम जाजू उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यार्थीदर्शत ज्या वसतिगृहाच्या खोलीत राहत होते, त्या खोलीचे मोदींनी दर्शन घेतले.
राष्ट्र उभारणीसाठी संशोधनात्मक विकास हवा : नरेंद्र मोदी
ते म्हणाले, राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षणाचा मोठा वाटा आहे. देशाच्या महान शिक्षण परंपरेची रया गेली आहे. पूर्वी भारतीय शिक्षण मॅन मेकिंग मिशन होते. आता शिक्षण मनी मेकिंग मशीन झाले आहे. या परिस्थितीत बदल झाला पाहिजे. स्वातंत्र्य मिळूनही देशाची स्थिती तशीच आहे. त्यासाठी शिक्षणामध्ये आधुनिकीकरण यायला हवे, पण तसे करीत असताना पाश्चिमात्यकरण येणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शिक्षणाबाबत सरकारचे ठोस धोरण नाही. देशात निराशेचे वातावरण आहे. पण निराशेचे ढग लवकरच सरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमेरिकेत पीएच.डी केलेल्या प्रत्येक संशोधनाची दखल घेण्यात येते. त्या संशोधनाचा राष्ट्रीय धोरण ठरविताना किंवा देशाच्या विकासासाठी उपयोग केला जातो. परंतु भारतात पीएच.डीद्वारे संशोधन होते. पण या संशोधनाला महत्त्व दिले जात नाही. अशा संशोधनाची एकत्रित माहितीही उपलब्ध होत नाही. संशोधनातून विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी संशोधनावर भर देण्याची गरज आहे. संशोधनाला महत्त्व न देणार्या देशाचा विकास थांबतो. त्यामुळे संशोधनाला महत्त्व देणे आवश्यक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात अनुदान देऊनही आदिवासीचा विकास का होत नाही, यासाठी संशोधनाचा आधार घेण्यात आला. त्यानुसार नवीन योजना सुरू करण्यात आली. आता आदिवासी जीवनात बदल होत असल्याचे दिसून येत आहे.
मोदी म्हणाले, जगातील समस्या सोडविण्यासाठी भारतीय युवाश्नती कामी येऊ शकते. त्यांचा राष्ट्रउभारणीच्या कार्यात पुरेपूर उपयोग करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तरुणांना दिशा देण्याची आणि मार्गदर्शकाची गरज आहे. देशातील तरुणांमध्ये मोठी गुणवत्ता आहे. पण त्याचा वापर होत नाही. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. आजचा तरुण विचार करणारा, सामर्थ्यवान आहे. अशा तरुणांचा देश नेहमीच आघाडीवर राहील व जगाला खूप काही देऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र मोदी अन् सोशल मीडिया
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी भाषणाची सुरुवात करताना फेसबुकवरून तरुणांसोबत नेहमीच विचारांची देवाणघेवाण होत असल्याचे त्यांनी सांगितले. मी फर्ग्युसन महाविद्यालयात उद्या विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करू, असे आवाहन केले होते. त्यात बहुतांश तरुणांनी अनेक चांगले सल्ले दिले. आज मी जे शिक्षणाबाबत विस्तृत्व विचार मांडले, त्यात या फे सबुकवरील तरुणांचे योगदान असल्याचे त्यांनी मान्य केले. दक्षिण कोरियासारखा छोटा देश ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो. त्या तुलनेत भारतासारखा मोठ्या देशाने राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन केले. पण घोटाळ्यामुळे जगभरात देशाची प्रतिमा मलिन झाली आहे. असे असेल, तर आपण ऑलिम्पिक आयोजनाकडे कसे वाटचाल करणार? असा सवाल नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.
