मोबाईलचा वापर आरोग्यास घातक

न्यूयॉर्क : तुम्ही मोबाईलचा वापर जेवढा जास्त कराल तेवढा तुमच्या आरोग्याला धोका पोहोचेल असे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीतून आढळले आहे. ब्रिटनमधील केंट स्टेट युनिव्हर्सिटी या विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले आहे. जे विद्यार्थी दिवसातले चौदा तास मोबाईल फोनचा कसला ना कसला वापर करतात ते विद्यार्थी शारीरिकदृष्ट्या कमी क्षमतेचे असल्याचे आढळून आले. याउलट ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईलफोनच नाही किंवा असला तरी ते त्याचा वापर दिवसातला एखादा तासभर करतात त्यांचे आरोग्य अती वापर करणार्‍यांपेक्षा चांगले असल्याचे दिसून आले.

जे विद्यार्थी मोबाईल फोन, व्हिडीओ, टी.व्ही. यांचा वापर जास्त करतात किंवा बैठे खेळ खेळतात आणि करमणुकीसाठी बैठी साधनेच वापरतात. त्यांच्या शारीरिक क्षमता फार क्षीण असल्याचे दिसून आले. चित्रपट पहात बसणे किंवा व्हिडीओ गेम्स् खेळणे याकडे त्यांचा अधिक ओढा असतो. अशा तरुणांचे हृदय कमकुवत असते आणि त्यांना श्‍वासाचे विकार लवकर होतात असे या पाहणीच्या निष्कर्षात म्हटलेले आहे. मोबाईल फोनचा वापर तरुण मुलांमध्ये शारीरिक हालचालींना प्रतिबंध करणारा ठरत असतो. अशी मुले मोबाईलवर गेम खेळतात पण मैदानात उतरून घाम गाळायला लावणारा खेळ त्यांना आवडत नाही.

मोबाईल या साधनाच्या नावाचा अर्थ मोबाईल म्हणजे चालणारा फिरणारा असा होतो. परंतु मोबाईलचा वापर करणारे तरुण फोन मोबाईल वापरतात स्वतः मात्र मोबाईल होत नाहीत. असे या पाहणीचे निष्कर्ष आहेत. ते इंटरनॅशनल जर्नल ऑफ बिहेवियरल न्यूट्रीशन ऍन्ड फिजीकल ऍक्टिव्हिटी या ऑनलाईन नियतकालिकात प्रसिध्द करण्यात आले आहेत.

Leave a Comment