रशियाकडून टाईपरायटर्सची खरेदी

मास्को दि.१३ – विकिलिक्स आणि आता स्नोडेन यांनी राष्ट्रीय महत्त्वाची गुपिते जगजाहीर केल्याच्या प्रकरणाचा धडा घेऊन रशियाच्या फेडरल गार्ड सर्व्हिस या क्रेमलिन कम्युनिकेशन संस्थेने संगणकाच्या हार्डवेअरऐवजी राष्ट्रीय महत्त्वाची गुप्त कागदपत्रे टाईप करण्याचा निर्णय घेतला आहे असे समजते. रशियन अध्यक्ष पुतीन यांच्याही संरक्षणाची जबाबदारी याच फेडरल सर्व्हीसवर आहे. राष्ट्रीय महत्त्वाची कागदपत्रे यापुढे रशियात इलेक्ट्रोनिक टाइपरायटरवरच टाईप केली जाणार असून त्यासाठी सुमारे ४,८६,००० रूबल्स ( सुमारे ९ कोटी रूपये ) खर्च करून २० टाईपरायटर खरेदी केले जात असल्याचेही समजते.

या टाईपरायटर्सची खरेदी १ वर्षाच्या कालावधीत केली जाणार आहे. प्रिंटर्सप्रमाणेच प्रत्येक टाईपरायटरचा टाईप विशिष्ठ पॅटर्नचा असतो. त्यामुळे कुठले डॉक्युमेंट कुठल्या टाईपरायटरवर टाईप केले गेले याची लिंक जुळविणे शक्य असते. स्नोडेन आणि विकिलिक्सने अमेरिकेची अनेक महत्त्वाची गुपिते जाहीर केल्यामुळे संगणकावरील माहिती आता सुरक्षित राहिलेली नाही असेही या संस्थेचे म्हणणे आहे.

Leave a Comment