‘भाग मिल्खा भाग’

भारतीय अ‍ॅथलेटपटुमध्ये प्रसिद्ध नाव मिल्खासिंग. बॉलिवुडमध्ये कमर्शियल चित्रपटांमध्ये नवनवीन प्रयोग करणारा अभिनेता, दिग्दर्शक फरहान अख्तर याने ‘भाग मिल्खा भाग’मध्ये मिल्खासिंग यांची भूमिका जीव ओतून साकारली आहे. मिल्खासिंग यांना मिळालेले यश हे काही सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी त्यांना अपार कष्ट घ्यावे लागले. त्यांचे संघर्षमय जीवन अतिशय सुरेखपणे राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी मांडले आहे.

भारत-पाकिस्तानची फाळणी 1947 साली त्यामध्ये अनेकांना आपले गाव सोडावे लागले. नातलगांची ताटातूट झाली. जगण्याच्या लढाईत नियतीने घरातील सर्वांना हिरावून नेले. परिस्थितीशी झगडत जिवंत राहिलेला मुलगा म्हणजे मिल्खा सिंग. त्याने कर्तृत्वाच्या जोरावर इतिहास निर्माण केला. त्याच्या वडिलांनी म्हटलेले शब्द कायम त्याच्या स्मरणात राहिले, ते म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’ याच आज्ञेचे पालन करत मिल्खा धावत राहिला आणि त्याच्या धावण्याने इतिहास निर्माण केला. या चित्रपटात मिल्खासिंग यांच्या जीवनातील काही भावनात्मक घडामोडी अशा प्रकारे मांडल्या आहेत की प्रेक्षकांच्या डोळ्यात नकळत अश्रु तरळतात. ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाची सुरुवात दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहराने रोमपासून केली आहे. 1960च्या ऑलिम्पिकमध्ये विजेच्या वेगाने धावत असलेला मिल्खा एक क्षणभर मागे वळून बघतो आणि त्याचक्षणी त्याच्या नशिबाचे फासे पालटतात. यानंतर सुरू होतो मिल्खाच्या जीवनाचा प्रवास. यादरम्यान त्याला बर्‍याच सुख-दुःखांचा सामना करावा लागतो.

मिल्खासिंगचे कुटुंब फाळणीमध्ये बळी पडले आहे. जगण्याच्या उमेदीने दिल्लीला पोहोचलेल्या मिल्खासिंगला योगायोगाने रिफ्यूजी कँपमध्ये त्याची बहीण (दिव्या दत्ता) भेटते. छोट्या चोर्‍या – मार्‍या करणारा मिल्खा दिल्लीत बहिणीकडे राहत असताना निर्मल कौर(सोनम कपूर) च्या प्रेमात पडतो. तिच्या सांगण्यावरून आणि आयुष्यात काही बनण्याच्या जिद्दीने तो भारतीय सैन्य दलात भरती होतो. सैन्यातील प्रशिक्षक त्याच्यातील अ‍ॅथलेटचे गुण ओळखतात. आणि त्यानंतर त्यांचे एकच ध्येय बनते ते म्हणजे एक चांगला धावपटू बनणे. मिल्खाच्या स्वप्नपूर्तीमध्ये असंख्य अडथळे येतात; मात्र तो हार न मानता लढतो, त्याच्या जिद्दीची कहाणी म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’. ‘रंग दे बसंती‘ चित्रपटापसून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला दिग्दर्शक राकेश मेहरा.

‘भाग मिल्खा भाग’ च्या निमित्ताने पुन्हा एक वेगळा विषय घेऊन आपल्यासमोर आला आहे. 50-60च्या दशकातील काळ साकारण्यातही राकेश मेहरा बर्‍याच प्रमाणात सफल राहिले आहेत. फाळणीची दृश्ये, ऑलिम्पिक स्पर्धा, आशियाई गेम्स याचे उत्तम चित्रण, मांडणी त्याने केली आहे, यात शंका नाही. प्रसुन जोशी यांनी अतिशय नाजुकपणे याचे कथानक लिहिले आहे. यात ड्रामा, इमोशन, ह्युमर आणि जोश दिसून येतो. त्यामुळे प्रत्येक सीन प्रेक्षकाला कथेशी बांधून ठेवतो. ‘दिल चाहता है’द्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार्‍या फरहान अख्तरने रॉक ऑन, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादु दाखवली अहे. फरहानने साकारलेली मिल्खासिंग यांची भूमिका वाखाणण्याजोगी आहे. त्याने या भूमिकेसाठी घेतलेली पुरेपूर मेहनत त्याच्या अभिनयातून झळकते. प्रकाश राज, दिव्या दत्ता, पवन मल्होत्रा आणि सोनम कपूर यांनीही आपल्या भूमिका उत्तम सादर केल्या आहेत. शंकर, एहसान आणि लॉय यांचे संगीत, पार्श्‍वसंगीत रॉकिंग आहे. चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणारी गाणी प्रसुन जोशींनी लिहिली आहेत. एका अ‍ॅथलेटचं धगधगतं आयुष्य अतिशय सुंदर पद्धतीने ‘भाग मिल्खा भाग’मध्ये सादर करण्यात आले आहे.

चित्रपट – भाग मिल्खा भाग
निर्माता – राकेश ओमप्रकाश मेहरा
दिग्दर्शक – राकेश ओमप्रकाश मेहरा
संगीत – शंकर- एहसान – लॉय
कलाकार : फरहान अख्तर, सोनम कपूर, दिव्या दत्ता, प्रकाश राज

रेटिंग – * * * *

Leave a Comment