बॉलिवूडच्या ‘प्राण’वर अंत्यसंस्कार

मुंबई- बॉलीवूडमध्ये खलनायक आणि चरित्रनायक म्हणून ठसा उमटविणा-या अभिनेता प्राण यांनी शुक्रवारी लीलावती रूग्णालयात रात्री साडेआठ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडचा ‘प्राण’ हरपला आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलीवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते.

प्राण यांच्यावरील अंत्यसंस्कारास अभिनेता अमिताभ बच्चन रझा मुराद उपस्थित होते. तर अभिनेता शाहरुख खान, रितेश देशमुख, करण जोहर, मधुर भांडारकर, प्रिती झिंटा यांनी ट्विटरवरुन प्राण यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. तब्बल सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘प्राण’ म्हणून मिरवणा-या या अभिनेत्याला २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते.

त्यांनी फिल्म फेअर पुरस्कार, राज कपूर पुरस्कार असे कित्येक मानाचे पुरस्कार मिळवले होते. भारतीय चित्रपटसृष्टी शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करत असतानाच काही दिवसापूर्वीच अभिनेता प्राण यांना दादासाहेब फाळके जीवन गौरवसारख्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने बॉलीवूडची मोठी हानी झाली असून त्यांरचा सारखा अभिनेता पुन्हा होणार नाही अशा शब्दात त्यांना अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Comment