कैद्यांना पगारवाढ – संजूबाबालाही होणार फायदा

मुंबई दि.१३ – महाराष्ट्र राज्याच्या तुरूंगातील कैद्यांना रोजगार वाढ देण्यात येणार असून याचा लाभ आपल्या संजूबाबाबरोबर आणखी ३ हजार कैद्यांना होणार आहे असे समजते. गेली तीन वर्षे तुरूंग प्रशासन कैद्यांना रोजगार वाढ केली जावी यासाठी प्रयत्नशील होते कारण रोजगार हमी योजनेत दररोज १२० रू. मजुरी दिली जाते मात्र महाराष्ट्रातील कैद्यांना त्यापेक्षा कितीतरी कमी रोजगार दिला जात आहे.

याविषयी वरीष्ठ तुरूंगाधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या अतिकुशल कैद्यांना रोज ४० रूपये , कुशल कारागिरांना ३५ तर अकुशल कैद्यांना रोज २५ रूपये रोजगार दिला जातो. देशात इतका कमी रोजगार कुठल्याच राज्याच्या तुरूंगात दिला जात नाही. यामुळे तिहार, कर्नाटक आणि गुजराथ येथील तुरूंगाची पाहणी करून त्यानंतर कर्नाटक राज्याप्रमाणे रोजगार आपल्या इथेही दिला जावा असा प्रस्ताव गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.

कर्नाटकात अतिकुशल कैद्यांना ९०, कुशल ८० तर अकुशल कैद्यांना दररोज ७० रूपये पगार दिला जातो. महाराष्ट्रातील जुन्या कैद्यांना ही पगारवाढ लागू होणार असून त्यासाठी नेमलेल्या समितीने आपला अहवाल १ महिन्यांत सादर करावयाचा आहे. त्यानंतर ऑगस्टपासून ही पगारवाढ लागू केली जाईल असे समजते.

राज्यातील तुरूंग अत्याधुनिक करण्यासाठीही कृती आराखडा तयार केला गेला आहे. त्यासाठी कोट्यावधी रूपये खर्च येणार आहे. मात्र नुकताच गँगस्टर अबू सालेम वर तुरूंगात झालेला हल्ला पाहता तुरूंगातील सुरक्षा पुरेशी नाही हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे उत्तम शस्त्रास्त्रे, सीसीटिव्ही, उच्च क्षमतेचे स्कॅनर राज्यातील तुरूंगात बसविले जाणार असल्याचेही समजते.

Leave a Comment