अन्नसुरक्षेबाबत लवकरच देशव्यापी मोहीम

पुणे, दि. 13-हॉटेल हा असा व्यवसाय आहे की, तेथे चविष्ट अन्न मिळते पण ते चांगले आहे का याबाबत शंकाच असते. पण या व्यवसायातील लोकांमध्ये व एकूणच समाजात अन्न सुरक्षिततेबाबत जागृती व्हावी, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने (एफडीए) अन्न सुरक्षा मोहीम हाती घेण्यात आली आहे. पुढील महिन्यापासून पुणे शहरातून या मोहिमेची सुरूवात होणार आहे. मिशन सेफ फूड इंडियाची घोषणा एफडीएचे आयुक्त महेश झगडे यांनी आज केली.हा प्रयोग टप्प्याटप्पयाने सर्व देशभर राबवला जाणार आहे. आजच्या पत्रकार परिषदेला एफडीएचे सह आयुक्त शशिकांत केकरे, बी. आर. मासळ, बिंद्रा हॉस्पिटॅलिटीचे गुरविंदर बिंद्रा उपस्थित होते. पुण्यानंतर मुंबई, नागपूर व उर्वरित राज्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात संपूर्ण देशात हा प्रयोग राबविण्यात येईल,असे आयुक्त महेश झगडे यांनी स्पष्ट केले.

अन्नपदार्थ तयार करताना, वाढताना अन्न सुरक्षिततेबाबत घ्यावयाची काळजी, कर्मचार्‍यांनी कोणता पेहराव करावा, कर्मचार्‍यांनी आरोग्य व स्वच्छतेविषयक कोणते नियम पाळले पाहिजेत, अशा स्वरुपाची माहिती तज्ज्ञ व्यक्तींमार्फत दिली जाणार आहे. या शिवाय शाळेतील विद्यार्थ्यांनाही अन्न व्यवस्थापनाची पुस्तिका वाटण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात हॉटेल-रेस्टॉरंट मालक, तेथील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात अमृततुल्य, लहान-मोठी हॉटेल्स, खानावळीतील कर्मचार्‍यांना तर तिसर्‍या टप्प्यात हातगाडीवाले, पथारीवाल्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. झगडे म्हणाले, भारतात अन्न चवीने खाल्ले जाते. मात्र त्याच्या स्वच्छतेविषयी तितकी काळजी घेतली जात नाही. स्वच्छतेबाबतचे निकषही पाळले गेले पाहिजेत. अगदी उत्कृष्ट प्रतीचा भाजीपाला खरेदी करण्यापासून ते अन्न तयार करण्याची प्रक्रिया योग्यरीतीने पाळायला हवी. त्यासाठीच सर्वसमावेशक प्रशिक्षण सुविधा असलेली अन्नसुरक्षा मोहीम हाती घेण्यात येत आहे. बिंद्रा म्हणाले, अगदी कारमध्ये आलेल्या ग्राहकाने वडापावच्या गाडीवर चवीने खाल्ले पाहिजे, त्यासाठी गाडीवरील व्यक्तीच्या गणवेशासह स्वच्छतेचे निकष पाळले गेले पाहिजेत. या मोहिमेच्या माध्यमातून ही संकल्पना रुजविण्यात येईल. मोहिमेच्या पहिल्या टप्यात एक हजार लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Leave a Comment