मास्को दि.१३ – अमेरिकेची सुरक्षा विषयक गुप्त कागदपत्रे लीक करणारा एडवर्ड स्नोडेन याने अमेरिकेविरोधातली कोणतीही कागदपत्रे लीक करू नयेत तसेच अमेरिका आणि रशियातील संबंधात बिघाड होईल असे वर्तन करू नये आणि त्याने स्वतः रशियात आश्रय मागावा तर स्नोडेन रशियात राहू शकेल असे क्रेमलिन तर्फे मानवी हक्क कार्यकर्त्यांना सांगितले गेले असल्याचे समजते. स्नोडेनच्या वकील गेन्री रेनझिक, स्नोडेन आणि पुतीन यांचे प्रवक्ते पेस्कॉव्ह यांच्यात मास्को विमानतळावर झालेल्या बैठकीत हे स्पष्ट करण्यात आले असे वृत्त आहे.
स्नोडेन सध्या मास्को विमानतळावर ट्राझिट झोनमध्ये असून त्याने रशियात आश्रय मिळावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी फोनवर संपर्क साधून स्नोडेनला प्रसिद्धीसाठी रशिया व्यासपीठ पुरवत असल्याबद्ल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याला अमेरिकेत परत पाठवावे असेही रशियाला सांगितले गेले असल्याचे व्हाईट हाऊसकडून सांगण्यात येत आहे. मात्र यातून अजून तरी कोणताही मार्ग निघालेला नाही.
त्यातच पुतीन यांचे प्रवक्ते द्रिमिती पेस्कॉव्ह यांनी स्नोडेनने अमेरिकेला नुकसान होईल असे कोणतेही कृत्य करू नये व स्वतः रशियात आश्रय मागावा असे सुचविले आहे.