भारतातील रजियाला मिळाला पहिला मलाला पुरस्कार

नवी दिल्ली – शिक्षण घेणे व सुशिक्षित होणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र तो मिळविण्यासाठी कधी कधी बरेच झगडावे लागते. अशी अनेक उदाहरणे आहेत की, ज्यांना आपला हक्क, अधिकार मिळविण्यासाठी अंगावर गोळ्या, हत्यारांचे वार सहन करावे लागले आहेत. तसेच काही जणांनी हा हक्क मिळविण्यासाठी बलिदानही दिले आहे.

नुकत्याच काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातील सोळा वर्षीय मलाला यूसुफजई शुक्रवार या युवतीने तालिबानी आदेश झुडकारत त्याविरोधात लढा दिला. त्यामध्ये केलेल्या हल्ल्यात ती जखमी झाली. मात्र तिने आपल्या निश्‍चय सोडला नाही. या लढ्यात तिचाच विजय झाला. त्यामुळे 12 जुलै या मलालाच्या वाढदिवसानिमित्त पहिला मलाला पुरस्कार भारतातील मेरठ येथील 15 वर्षीय रजिया रॉय हिला जाहीर झाला.

मात्र,न्यूयॉर्कमध्ये होणार्‍या या कार्यक्रमाला रजिया जावू शकणार नाही. रजियाची यशस्वी कहानी संपूर्ण जगाला मी सांगेन, असे संयुक्त राष्ट्र
संघाचे महासचिवांचे विशेष राजदूत गार्डन ब्राऊन यांनी पत्र लिहून सांगितले आहे. आपल्या लहान व कोवळ्या हातात लेखणी व पुस्तक घेण्याऐवजी फुटबॉलला आकार देण्याचे काम करणार्‍या रजियाने स्वतःसोबत अनेक मुलींना शिक्षणाची दारे उघडून देण्यासाठी प्रयत्न केला. यामुळे संयुक्त राष्ट्रानेही रजियाच्या
या संघर्षाला दाद देत तिला भारताची मलाला असे म्हणून संबोधिले आहे.

रजिया जेव्हा पाच वर्षांची होती तेव्हाच तिच्या या संघर्षाची सुरूवात झाली. मेरठमधील नांगली कुंबा या गावात लहानपण हे फक्त फुटबॉलला शिलाई मारण्यात गेले. तेच एक कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले होते. फुटबॉलला मारली जाणारी शिलाई ही मोठ्यांपेक्षा छोट्यांकडून करून घेतली जाते, कारण ती शिलाई अधिक बारीक होते व फुटबॉल टिकावू बनतो.

फुटबॉलला शिलाई मारताना या लहान हातांची बोटेही वाकडे होण्याची वेळ आली होती. याच काळात काही स्थानिक संस्थांनी बचपन बचाओ आंदोलनाची सुरूवात केली. तसेच या मुलांच्या घरच्यांना समजावून सांगितले. त्यामुळेे रजिया आणि तिच्या समवयस्क मुलींची सुटका झाली. 15 वर्षीय रजियाने आतापर्यंत जवळपास 46 मुलांना बालमजुरीपासून सोडवले आहे. त्याचबरोबर त्यांना शाळेत भरती केले आहे.

ती स्वतः कुराली येथील एसडीआर महाविद्यालयातून 11 वी पास झाली आहे. आसपासच्या अनेक खेड्यातही तिने शिक्षणाबाबत जनजागृती केली आहे. त्यामुळे
या भागात आता बाल कामगारांकडून काम करून घेतले जात नाही. यावेळी बोलताना तिने सांगितले की, यापुढे मी समाजसेवाच करणार आहे. समाजातील काही रुढी बदलत असल्याने बरे वाटत आहे. तिने शाळेजवळ पिण्याच्या पाण्याची, मुलींसाठी शौचालय तसेच आपल्या गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी गावाच्या हद्दीवर भिंत उभारली असल्याचेही तिने यावेळी सांगितले.

Leave a Comment