बलात्कार पीडितेची जीभ कापण्याचा प्रयत्न

लखनौ : न्यायालयातील खटल्यामध्ये साक्षीदाराने साक्ष देऊ नये यासाठी त्याची जबान बंद ठेवण्याचा प्रयत्न केला जातो पण तो लक्ष्यार्थाने असतो. पण उत्तर प्रदेशाच्या प्रतापगड जिल्ह्यातील एका न्यायालयात सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यातील पीडित मुलीची जीभ शब्दशः कापण्याचा प्रयत्न करण्यात आला. या मुलीवर बलात्कार झाला होता आणि तिच्यावर बलात्कार करणारा तरुण सध्या तुरुंगात आहे. मुलीने बलात्कार झाल्याचा जबाब दिला तर या तरुणाला कमीत कमी सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा होणार आहे.

ही शिक्षा टळावी म्हणून आरोपीच्या भावाने अन्य दोघां मित्रांच्या मदतीने या मुलीला एकटी गाठून जेठवारा या गावात तिची जीभ कापण्याचा प्रयत्न केला. या संबंधांत आरोपीचा भाऊ आणि त्याच्या एका मित्रालाा अटक करण्यात आलेली आहे आणि तिसर्‍या व्यक्तीचा शोध सुरू आहे. या चित्तथरारक प्रकारात या १९ वर्षाच्या मुलीच्या जिभेला जखम झाली आहे आणि तिच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे आणि बलात्कारित तरुणासह या तिघांनाही कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या मुलीवर गेल्या २२ जानेवारी रोजी बलात्कार करण्यात आला होता आणि बलात्कार करणारा आरोपी तेव्हापासून तुरुंगात आहे. त्याच्यावरील खटल्याचे कामकाज सुरू आहे आणि न्यायालयाची पुढची तारीख २४ जुलै ही पडली आहे. त्यावेळी या मुलीने जबाब देऊ नये आणि त्यासाठी तिला बोलता येऊ नये म्हणून आरोपीच्या भावाने हा उद्योग केला.

Leave a Comment