इंडोनेशिया : 22 दहशतवाद्यांसह 150 कैद्यांचे तुरुंगातून पलायन

मेदान (इंडोनेशिया) – हिंसक आंदोलनादरम्यान आग लागल्याची संधी साधत इंडोनेशियामधील तुरूंगामधून 22 दहशतवाद्यांसह 150 कैद्यांनी पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. या आंदोलनात 3 पोलीस कर्मचार्‍यांसह 2 कैद्यांचा मृत्यू झाला आहे. पळून गेलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

लोकसंख्येच्या बाबतीत मेदान शहराचा इंडोनेशियात चौथा क्रमांक लागतो. कडेकोट सुरक्षा असलेल्या तनजंग गुस्ता या तुरुंगामध्ये विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने कैद्यांनी कारागृहाविरोधात आंदोलन छेडले होते.

या तुरुंगाची कैदी ठेवण्याची क्षमता 1,054 असताना तेथे 2 हजारहून अधिक कैद्यांना डांबून ठेवले आहे. यामुळे येथे पाणी आणि अन्य सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. यामुळे संतापलेल्या कैद्यांनी आज तुरुंग प्रशासनाविरोधात आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान कैद्यांनी तुरुंगात आग लावल्याने वातावरण अधिकच हिंसक झाले.

यावेळी लागलेल्या आगीत दोन कैदी व तीन तुरुंग कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. मेदान शहरामधील या घटनेत पळून गेलेल्या अनेक कैद्यांचा शोध घेण्यासाठी चारही बाजूने नाकाबंदी करण्यात आली आहे. यात पळून गेलेल्या 22 दहशतवाद्यांपैकी तिघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर पळून गेलेल्या 22 कैद्यांना पोलिसांनी पुन्हा अटक केली असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment