अमेरिकेत होणार आंबा, द्राक्षांची विक्री

नवी दिल्ली- 2007 मध्ये अमेरिकेने भारतीय आंबा अमेरिकेतील बाजारात विकण्यास मुभा दिली होती. मात्र, दर्जाबाबत अडचणी आल्याने आंबा निर्यात थांबली. आता आंब्याची तपासणी नवी दिल्लीस्थित अमेरिकेच्या दुतावासात करण्याचा प्रस्ताव अमेरिकेने ठेवल्याने भारतीय कृषी उत्पादनासाठी अमेरिकेचे दरवाजे उघडण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अमेरिकेवर दबाव टाकण्यात येत आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री आनंद शर्मा सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयाशी ते यासंदर्भात चर्चा करणार आहेत. भारतीय आंबा, द्राक्षे, डाळिंब आणि लिची ही फळे अमेरिकेच्या बाजारात पाठवण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली. वाणिज्य मंत्रालयातील सूत्रांनुसार, आंबा निर्यातदारांचा खर्च कमी होणार आहे.

डाळिंब निर्यातीबाबतही ही अडचण होती. भारतीय द्राक्षांना अमेरिकेच्या बाजारात स्थान मिळवून देण्यासाठी भारताकडून 2008 पासून प्रयत्न सुरू आहेत. द्राक्षांवर वारण्यात येणार्‍या कीटकनाशकांशी निगडित जोखमीबाबतची विस्तृत माहिती अमेरिकेला देण्यात आली आहे. मात्र, याबाबत अमेरिकेकडून अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.

लिचीच्या निर्यातीचा मुद्दा अमेरिकेच्या पर्यावरण संरक्षण एजन्सीकडे अडकला आहे. या सर्व मुद्द्यांबाबत अमेरिका सरकारच्या उच्चपदस्थांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. यंदाच्या जानेवारी ते मे या काळात 16.17 अब्ज डॉलरची निर्यात करण्यात आली आहे.

Leave a Comment