मोबाईल चार्ज करणारा सोलर हेडफोन

लंडन दि.१२ – यूकेमधील अँड्रू अँडरसन या ग्लासगो येथील डिझायनरने ऑनबीट हेडफोन या नावाने एक उपकरण तयार केले असून सोलर उर्जेवर चालणार्याा या हेडफोनवर मोबाईल चार्ज करता येऊ शकणार आहे. पुढच्या वर्षाच्या सुरवातीला हा हेडफोन बाजारात विक्रीसाठी आणण्याची तयारी तो करत आहे. अर्थात त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे आणि तो किमान २ लाख पौंड उभे करण्याच्या प्रयत्नात आहे.

अँड्रूच्या म्हणण्यानुसार असा हेडफोन बनवायची मूळ कल्पना त्याच्या वडिलांची आहे. अँड्रूने ती प्रत्यक्षात उतरविली आहे. त्यासाठी हेडफोन बँड पूर्णपणे कव्हर करू शकेल असा लवचिक सोलर सेल वापरला गेला आहे. आपण बाहेर हिडत असताना हा हेडफोन लावला तर त्यातील सेल सौर उर्जा शोषून घेतात आणि ही उर्जा दोन हलक्या वजनाच्या लिथियम बॅटरीत साठविली जाते. या बॅटर्‍या हेडफोनच्या इअर कपमध्ये बसविल्या गेल्या आहेत. यावर आपला मोबाईल चार्ज होऊ शकतो.

पावसाळ्याच्या दिवसांत सूर्यप्रकाश नसतो किवा कमी असतो, त्यावेळी या बॅटर्‍या घरातल्या संगणकाच्या यूएसबीवर किवा घरातील कोणत्याही इलेक्ट्रिक प्लगवरही चार्ज करता येतात असे अँड्रूचे म्हणणे आहे. अर्थात या हेडफोनवर आणखी थोडे काम करावे लागणार आहे असेही त्याचे म्हणणे आहे. कारण हेडफोन लावला असतानाही रस्त्याने जाताना बाकी आवाजही एकू यायला हवेत व त्यासाठी कांही सोय करायला हवी असे त्याला वाटते.