इंदोर दि.१२ – बनावट नोटांचा सुळसुळाट थांबविणे आणि नोटांचे आयुष्यमान वाढविण्यासाठी रिझर्व्ह बँक प्लॅस्टीक नोटा चलनात आणण्यासाठी सिद्ध झाली आहे. केंद्राकडून हिरवा कंदिल मिळताच प्रथम दहा रूपये मूल्याच्या प्लॅस्टीक नोटा चलनात आणल्या जातील असे रिझर्व्ह र्बंकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना सागितले.
ते म्हणाले आम्ही केंद्राच्या मंजुरीची प्रतीक्षा करत आहोत. ही मंजुरी मिळताच परदेशातून प्रथम १० रूपये मूल्याच्या प्लॅस्टीक नोटा विदेशी प्रेसमधून छापून आयात केल्या जाणार आहेत. ही योजना यशस्वी ठरली तर मात्र भारतातच त्यांची छपाई केली जाणार आहे. बनावट नोटांची समस्या मोठी असल्याचे मान्य करून ते म्हणाले की केंद्रीय बँकांना अशा नोटा जमा करून पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.
मोठ्या शहरात बनावट नोटा प्रकरणी तक्रारी घेण्यासाठी विशेष पोलिस चौक्या असणे व तेथे प्रशिक्षित अधिकारी वर्ग नेमण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.